टेस्लाचं ठरलं...पहिला प्लांट गुजरातमध्ये! जानेवारीमध्ये मोदी-मस्क यांच्या उपस्थितीत घोषणेची शक्यता

इलॉन मस्कच्या टेस्ला कारची भारतातील प्रतीक्षा अखेर संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. नवीन वर्षात जानेवारीत होणाऱ्या 'व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट'मध्ये टेस्ला भारतात पदार्पण करण्याची घोषणा करू शकते.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

Tesla Entry In India : इलॉन मस्कच्या टेस्ला कारची भारतातील प्रतीक्षा अखेर संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. एका रिपोर्टनुसार, नवीन वर्षात जानेवारीत होणाऱ्या 'व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट'मध्ये टेस्ला भारतात पदार्पण करण्याची घोषणा करू शकते. इलेक्ट्रिक वाहन सप्लाय सिस्टम मॅन्युफॅक्चरिंग प्लांट स्थापन करण्याची घोषणा टेस्ला कंपनी करेल असे समजते. गुजरातमधील अनेक माध्यम संस्थांनी दिलेल्या वृत्तानुसार, ईव्ही निर्माती कंपनी त्यांच्या उत्पादन सुविधा उभारण्यासाठी जमिनीबाबत सरकारशी वाटाघाटी करण्याच्या अंतिम टप्प्यात आहे.

भारतात सध्या वाहन क्षेत्रही वेगाने विद्युतीकरण होत आहे. अशा परिस्थितीत अमेरिकन कंपनी टेस्लाही लवकरात लवकर भारतात येण्यास उत्सुक आहे. टेस्लाचे सीईओ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत १०-१२ जानेवारी रोजी होणाऱ्या एका मोठ्या कार्यक्रमात ही घोषणा होण्याची शक्यता आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी नोव्हेंबरमध्ये टेस्लाच्या फ्रेमोंट, कॅलिफोर्निया येथील अत्याधुनिक उत्पादन सुविधेला भेट दिली होती.

"टेस्ला गुजरातमध्ये येण्याबद्दल राज्य सरकारला खूप आशा आहे. इलॉन मस्क देखील गुजरातकडे त्यांची पहिली पसंती म्हणून पाहत आहेत. जेव्हापासून त्यांनी भारतात प्रकल्प उभारण्यासाठी योग्य जागा शोधण्यासाठी सर्वेक्षण सुरू केले तेव्हापासून गुजरात त्यांच्या मनात आहे. आम्ही निश्चितपणे त्याचे स्वागत करू आणि सर्व आवश्यक सहकार्य देऊ, जसे आम्ही यापूर्वी टाटा, फोर्ड आणि सुझुकीला दिले होते" असे गुजरात सरकारचे प्रवक्ते ऋषिकेश पटेल यांनी सांगितले.

गुजरात सरकारने साणंद, बेचराजी आणि ढोलेरा ही नावं टेस्लाला त्यांच्या उत्पादन प्रकल्पाच्या स्थापनेसाठी सुचवली आहेत. त्यापैकी साणंदला पहिली पसंत असल्याचे समजते. यापूर्वी गुजरात, महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये टेस्लाकडून प्लांट उभारण्यासाठी विचार सुरू होता. मात्र गुजरातवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in