
श्रीनगर : जम्मू-काश्मिरातील उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे जोड प्रकल्पातील कटरा-बडगाम रेल्वेमार्गावर रविवारी चाचणी पूर्ण झाली.
१८ डब्यांची एक्स्प्रेस सकाळी ८ वाजता कटरा रेल्वे स्थानकातून काश्मीरसाठी रवाना झाली. ही अखेरची चाचणी होती, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या प्रकल्पासाठी ४१ हजार कोटी रुपये खर्च झाला असून त्याची लांबी २७२ किमी आहे. यात १११ किमीचे बोगदे आहेत. यातील ‘टी-४९’ हा बोगदा १२.७७ किमी लांब आहे, तर रियासी जिल्ह्यातील चिनाब नदीवरील जगातील सर्वात उंच रेल्वे पूल या प्रकल्पातील एक भाग आहे. या पुलाची लांबी १,३१५ मीटर असून नदीपासूनची उंची ३५९ मीटर आहे. यासाठी १,४८६ कोटी रुपये खर्च आला.
रेल्वे आयुक्तांनी आपला अहवाल दिला असून सेवा चालवण्यास परवानगी दिली आहे. या मार्गाचे काम २००९ साली सुरू झाले व नुकतेच पूर्ण करण्यात आले.
४ तासांत अंतर कापले
या एक्स्प्रेसला १८ एसी डबे, दोन सामानाचे डबे लावले होते. या एक्स्प्रेसला दोन इंजिन लावले होते. सकाळी ८ वाजता ही ट्रेन कटराहून रवाना झाली. ती चार तासांत बडगामला पोहचली. या चाचणीत रेल्वेमार्ग, बोगदे, लाइट आदींची पाहणी केली. तसेच चालकांना ट्रेन चालवताना कसे वाटले याचीही नोंद करण्यात आली. वैष्णोदेवी ते संगलदानपर्यंत ट्रेन ८५ किमी प्रति तास, संगलदान ते काझीगुंडपर्यंत ७५ किमी प्रति तास आणि काजीगुंड ते बडगामपर्यंत १०० किमी प्रति तास वेगाने धावली.