
पनामा सिटी : काँग्रेसचे खासदार आणि सर्वपक्षीय शिष्टमंडळातील एका शिष्टमंडळाचे प्रमुख असलेल्या शशी थरूर यांनी मोठे विधान केले आहे. आता महात्मा गांधीजींचा देशही कुठलीही घटना घडल्यावर आपला दुसरा गाल पुढे करणार नाही तर प्रतिक्रिया देईल, असे थरूर यांनी ठणकावले आहे.
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यदलांनी ऑपरेशन सिंदूर राबवत या हल्ल्याचा बदला घेतला होता. त्यानंतर भारत सरकारने दहशतवादाविरोधातील आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी विविध देशांमध्ये सर्वपक्षीय शिष्टमंडळं पाठवली आहेत. या शिष्टमंडळांच्या माध्यमातून भारताचे प्रतिनिधी बनून गेलेले नेते विविध देशात भारताची भूमिका स्पष्ट करत आहेत. त्यावेळी थरूर यांनी वरील भाष्य केले आहे.
पनामा येथे भारतीय दूतावासाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात शशी थरूर यांनी दहशतवादाविरोधातील भारताचा दृढनिश्चय अधोरेखित केला. ते म्हणाले की, आपण आपल्या अधिकारांच्या रक्षणासाठी नेहमी उभे राहिले पाहिजे, असे महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्य लढ्यादरम्यान आपल्या साहसी नेतृत्वाद्वारे आम्हाला शिकवले होते. आपण ज्या मूल्यांवर विश्वास ठेवतो त्या मूल्यांच्या संरक्षणासाठी आपण उभे राहिले पाहिजे. भयापासून मुक्ती हीच एक गोष्ट आहे ज्यासाठी आपल्याला भारतामध्ये सध्याच्या दिवसांत त्यांच्या विरोधात लढायचे आहे, ज्यांना जग दहशतवादी म्हणून ओळखतात.
थरूर पुढे म्हणाले की, ही अशी गोष्ट आहे की ज्यापुढे कोणताही देशभक्त, देश झुकणार नाही. तसेच महात्मा गांधी यांची भूमीही असे घडल्यावर आपला दुसरा गाल पुढे करणार नाही. आता आम्ही अशा हल्ल्यांना पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देऊ, असा इशारा थरूर यांनी दिला. तसेच ऑपरेशन सिंदूरमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारासाठी हजर राहणाऱ्या पाकिस्तानी सैन्यावरही शशी थरूर यांनी टीका केली.
थरूर यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “माझ्या शब्दांचा विपर्यास करण्यासाठी टीकाकारांचे स्वागत आहे, पण खरोखरच माझ्याकडे करण्यासारखी खूप महत्त्वाची कामे आहेत,” असे थरूर यांनी त्यांच्या व्यस्त वेळापत्रकाचा हवाला देत लिहिले. काँग्रेस नेते, उदित राज यांनी थरूर यांच्यावर पक्षाच्या वारशाचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. याचबरोबर त्यांनी थरूर यांना “भाजपचे सुपर प्रवक्ते” बनवण्याचा सल्ला दिला आहे.
मला पनामातून सहा तासांत कोलंबियाला जावे लागले. त्यामुळे माझ्याकडे यासाठी खरोखर वेळ नाही. पण तरीही, नियंत्रणरेषेपलीकडे भारतीय लष्कराच्या शौर्याबद्दल माझ्या कथित अज्ञानाबद्दल बोलणाऱ्यांना मी सांगतो की, “मी फक्त दहशतवादी हल्ल्यांच्या बदल्याबद्दल बोललो होतो, मागील युद्धांबद्दल नाही”, असेही थरूर यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
अन्य महत्त्वाची कामे
पनामामध्ये केलेल्या या कथित विधानावरून शशी थरूर यांच्यावर त्यांच्याच पक्षातून विशेषतः उदित राज यांच्याकडून टीका झाली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना शशी थरूर यांनी, “माझ्याकडे यापेक्षा महत्त्वाची कामे आहेत”, असे म्हटले आहे. दरम्यान, शशी थरूर यांनी पनामामध्ये केलेल्या विधानांवर एक्सच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिले आहे. शशी थरूर यांनी स्पष्ट केले की, ते फक्त अलीकडील दहशतवादी हल्ल्यांनंतर झालेल्या सर्जिकल स्ट्राइकबद्दल बोलत होते, मागील युद्धांबद्दल नाही.