केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा एक एडिट केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओ प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने गृहमंत्रालयाच्या तक्रारीच्या आधारे एफआयआर दाखल केला आहे.
आयपीसीच्या विविध कलमांतर्गत आणि आयटी कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार स्पेशल सेलने हा एफआयआर नोंदवला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये अमित शहा एससी-एसटी आणि ओबीसींचे आरक्षण संपवण्याबाबत भाष्य करत असल्याचे दिसते. तथापि, हा व्हिडिओ फेक असून तो एडिट करण्यात आल्याचा आरोप भाजपने केला आहे. तेलंगणामधील एका राजकीय रॅलीदरम्यान शहा यांच्या मूळ विधानांचा विपर्यास करण्यासाठी या व्हिडिओमध्ये फेरफार करण्यात आल्याचे भाजपने म्हटले आहे.
फेसबुक आणि ट्विटरच्या वापरकर्त्यांद्वारे काही एडिटेड व्हिडिओ प्रसारित केले जात असल्याचे आढळले आहे. समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने हा दिशाभूल करणारा व्हिडीओ व्हायरल केला जात आहे, असे गृहमंत्रालयाने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
फेसबुक आणि एक्सकडून व्हिडीओची माहिती मागितली
दरम्यान, एफआयआर दाखल झाल्यानंतर आता दिल्ली पोलिसांनी एक्स आणि फेसबुकला पत्र लिहिले असून हा व्हिडिओ कोणत्या अकाउंटवरून टाकण्यात आला, याची माहिती दोन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मकडे मागितल्याचे समजते.
मालवीय यांचा आरोप
यापूर्वी, २७ एप्रिल रोजी भाजपचे आयटी सेल प्रमुख अमित मालविय यांनी हा फेक व्हिडिओ पोस्ट करत, तेलंगणा काँग्रेस एडिटेड व्हिडिओ पसरवत आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात हिंसाचार होण्याची शक्यता आहे. हा बनावट व्हिडिओ काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी शेअर केला आहे, आता त्यांनी कायदेशीर कारवाईसाठी तयार राहावे, अशी पोस्ट केली होती.