सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी तिघांची नेमणूक सरन्यायाधीशांनी दिली शपथ

या तीन नव्या न्यायाधीशांनी शपथग्रहण केल्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाच्या एकंदर न्यायाधीशांची संख्या ३४ झाली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी तिघांची नेमणूक सरन्यायाधीशांनी दिली शपथ

नवी दिल्ली : सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी गुरुवारी न्या. सतीशचंद्र शर्मा, न्या. ऑगस्टिन जॉर्ज मसिह आणि न्या. संदीप मेहता या तीन उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदाची शपथ देवविली. सर्वोच्च न्यायालयाच्या संकुलात अन्य न्यायाधीश, वकील आणि त्यांचे कुटुंबातील सदस्य यावेळी उपस्थित होते.

या तीन नव्या न्यायाधीशांनी शपथग्रहण केल्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाच्या एकंदर न्यायाधीशांची संख्या ३४ झाली आहे. या आधी न्या. शर्मा हे दिल्ली उच्च न्यायालयाच, न्या. मसिह राजस्थान उच्च न्यायालयाचे आणि न्या. मेहता हे गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. केंद्रीय कायदा मंत्री अर्दुन राम मेघवाल यांनी एक्सवर या नियुक्तींबद्दल माहिती दिली.

सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने ६ नोव्हेंबरला या तीन नावांची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदासाठी केली होती. यापैकी न्या. शर्मा हे मध्य प्रदेश न्यायालयात १८ जानेवारी २००८ रोजी न्यायाधीश म्हणून नियुक्त झाले होते. त्यानंतर त्यांची तेलंगणाच्या उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीशपदी ११ ऑक्टोबर २०२१ रोजी आणि तेथून त्यांची बदली २८ जून २०२२ रोजी दिल्ली उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश म्हणून झाली होती. त्यांनी १५ वर्षांपेक्षा अधिक काळ उच्च न्यायालयांत न्यायाधीश म्हणून काम केले असून मुख्य न्यायाधीश म्हणून दोन वर्षे काम केले आहे. त्यापूर्वी त्यांनी मध्य प्रदेशात कायदे सल्लागार म्हणून विविध क्षेत्रात काम केले होते.

न्या. मसिह यांची पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून १० जुलै २००८ रोजी नियुक्ती झाली होती. नंतर त्यांची राजस्थानच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून ३० मे २०२३ रोजी पदोन्नती झाली. न्या. मेहता यांची ३० मे २०११ रोजी राजस्थानच्या उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नेमणूक झाली होती. त्यानंतर गुवाहाटी न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून पदोन्नती झाली होती. उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून त्यांनी १२ वर्षांपेक्षा अधिक काळ अनुभव घेतला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in