राजनाथ सिंह भाजपच्या जाहीरनामा समितीचे प्रमुख

अनेक केंद्रीय मंत्री, गुजरात, आसाम आणि मध्य प्रदेश या राज्यांचे मुख्यमंत्री, तसेच शिवराजसिंह चौहान आणि वसुंधरा राजे यांच्यासारखे अनुभवी नेते या समितीच्या सदस्यांमध्ये आहेत. मात्र, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा समितीत समावेश नाही.
राजनाथ सिंह भाजपच्या जाहीरनामा समितीचे प्रमुख

नवी दिल्ली : भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा तयार करण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली २७ सदस्यीय समितीची शनिवारी घोषणा केली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन समितीच्या निमंत्रक असतील, तर केंद्रीय मंत्री पियूष गोयल सहसंयोजक असतील. यासह अनेक केंद्रीय मंत्री, गुजरात, आसाम आणि मध्य प्रदेश या राज्यांचे मुख्यमंत्री, तसेच शिवराजसिंह चौहान आणि वसुंधरा राजे यांच्यासारखे अनुभवी नेते या समितीच्या सदस्यांमध्ये आहेत. मात्र, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा समितीत समावेश नाही.

पक्षाचे माजी अध्यक्ष राजनाथ सिंह हे २०१९ च्या निवडणुकीसाठी भाजपच्या जाहीरनामा समितीचे प्रमुख होते. सध्याच्या समितीमध्येही अनेक सदस्यांची फेरनिवड झाली आहे. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, अश्विनी वैष्णव, भूपेंद्र यादव, किरेन रिजिजू, अर्जुन मुंडा, अर्जुन राम मेघवाल, स्मृती इराणी आणि राजीव चंद्रशेखर यांच्यासह गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, छत्तीसगडचे विष्णू देव साई आणि मध्य प्रदेशचे मोहन यादव यांचाही समितीत समावेश आहे.

बिहारचे नेते सुशील कुमार मोदी आणि रविशंकर प्रसाद, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, माजी केंद्रीय मंत्री जुआल ओरम, विनोद तावडे, राधामोहन दास अग्रवाल, मनजिंदर सिंग सिरसा, तारिक मन्सूर आणि अनिल अँटोनी यांचा समावेश करण्यात आला आहे. अँटनी आणि मन्सूर हे अनुक्रमे ख्रिश्चन आणि मुस्लीम चेहरे आहेत. हरियाणा भाजपचे माजी अध्यक्ष ओ. पी. धनकर हे देखील सदस्य आहेत.

logo
marathi.freepressjournal.in