
नवी दिल्ली : देशातील सर्वात लक्झरी एक्स्प्रेस ‘वंदे भारत’ सध्या पांढऱ्या व निळ्या रंगाची आहे. आता या गाडीच्या रंगसंगतीत बदल केले आहेत. तिरंग्याच्या रंगावरून प्रेरणा घेऊन ‘रंगां’तर केले आहे. तसेच या गाडीत २५ छोटे-छोटे बदल केले आहेत. प्रवासी व तज्ज्ञांनी याबाबत सूचना केल्या होत्या.
देशात सध्या २५ वंदे भारत एक्स्प्रेस चालत आहेत. दोन ट्रेन राखीव ठेवल्या आहेत. २८ व्या ट्रेनला केसरी रंग दिला आहे. ही ट्रेन सध्या चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीत ठेवली आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आरसीएफचे निरीक्षण केले. तसेच दक्षिण रेल्वेच्या सुरक्षा उपाययोजनांची समीक्षा केली आहे.
रेल्वे मंत्री म्हणाले की, ही रेल्वे ‘मेक इन इंडिया’ संकल्पनेवर आधारित आहे. अभियंते व तंत्रज्ञानांनी ही ट्रेन डिझाईन केली आहे. जनतेकडून व तज्ज्ञांकडून मिळालेल्या सूचनानंतर गाडीत बदल केले.
नवीन सुरक्षा यंत्रणा ‘एंटी क्लायबिंग डिव्हाईस’चे निरीक्षण वैष्णव यांनी केले. या यंत्रणेमुळे अपघात झाल्यास एक ट्रेन दुसऱ्या ट्रेनवर चढणार नाही. सर्व वंदे भारत व अन्य ट्रेनमध्ये ही यंत्रणा असेल. गाडीत चांगले कुशन बसवले असून, त्याचा अँगल बदलला आहे. एक्झिक्युटिव्ह चेअर कारमध्ये पाय सोडण्याची जागा वाढली आहे. वॉश बेसिनचा खोलगट भाग वाढवला आहे. वाचण्याच्या लाइटमध्ये सुधारणा केली आहे.