
नवी दिल्ली : सध्या सणासुदीचा मोसम देशात सुरू आहे. लाखो लोक आपापल्या गावासाठी रेल्वेने जाण्याचा प्रयत्न करत आहेत. ४० ते ५० तास तिकिटाच्या रांगेत घालवूनही रेल्वेचे ‘कन्फर्म’ तिकीट मिळत नाही. त्यामुळे हजारो प्रवासी उभे राहून प्रवास करतात. ही समस्या सोडवण्यासाठी रेल्वेने मोठी योजना आखली आहे. येत्या २०२७ पर्यंत प्रत्येक प्रवाशाला रेल्वेचे ‘कन्फर्म’ तिकीट मिळेल, अशी माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.
भारताच्या रेल्वे नेटवर्कमध्ये तीन हजार नवीन ट्रेन सुरू केल्या जातील. सध्या रोज १०७४८ ट्रेन चालत आहेत. तो आकडा १३ हजारांवर नेण्यात येणार आहे. ४ ते ५ हजार किमीचे नवीन रेल्वेमार्ग तयार केले आहेत, असे हे सूत्र म्हणाले.
प्रवासाचा कालावधी कमी करण्यावर भर
भारतात दरवर्षी ८०० कोटी जण रेल्वेने प्रवास करतात. ही संख्या १००० कोटींपर्यंत नेण्याचा रेल्वेचा विचार आहे. प्रवासाचा कालावधी कमी करण्यावर भर दिला जात आहे. रेल्वेमार्ग वाढवणे, वेग वाढवणे आदींवर काम सुरू आहे.
पुश-पूल तंत्राने मिळणार मदत
दिल्ली-कोलकाता प्रवासाचा वेळ २ तास २० मिनिटे कमी होऊ शकतो. त्यासाठी पुश-पूल तंत्र वापरावे लागणार आहे. सध्या वर्षाला २२५ एलएचबी कोच बनवले जात आहेत. त्यात पुश-पूल तंत्राचा वापर होत आहे.