एक गट भाजपात प्रवेशाच्या शक्यतेने काँग्रेस कार्यकारिणीला दोन दिवसांतच स्थगिती

जिल्हयात काँग्रेसचे अस्तित्व हे पदाधिका-यांच्या गटबाजीने कधीच संपलेले आहे. नेते आहेत पण कार्यकर्त्यांची वानवा आहे.
एक गट भाजपात प्रवेशाच्या शक्यतेने काँग्रेस कार्यकारिणीला दोन दिवसांतच स्थगिती

प्रतिनिधी/जळगाव : जिल्ह्यात अस्तित्वच नसलेल्या काँग्रेसची जम्बो जिल्हा कार्यकारिणी १५ जानेवारीला प्रदेशाच्या परवानगीने जाहीर करण्यात आली होती. मात्र, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. उल्हास पाटील व त्यांची कन्या डॉ. केतकी पाटील यांच्या संभाव्य भाजपा प्रवेशा संदर्भात जिल्हयात जोरदार चर्चा सुरू असून ही चर्चा थेट प्रदेशपर्यंत पोहचल्याने प्रदेश काँग्रेसने हे गांभीर्याने घेत जाहीर केलेल्या जिल्हा कार्यकारिणीस केवळ दोन दिवसात स्थगिती दिली. परिणमत: जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्त्यात गोंधळाचे वातावरण आहे.

जिल्हयात काँग्रेसचे अस्तित्व हे पदाधिका-यांच्या गटबाजीने कधीच संपलेले आहे. नेते आहेत पण कार्यकर्त्यांची वानवा आहे.पक्ष उभारण्याचा प्रयत्न हा केला गेला तर नेते आपल्या दावणीला पक्ष कसा बांधला जाईल , त्यातून केवळ आपले राजकीय हित कसे साधता येईल याकडे अधिक लक्ष देतांना दिसतात यामुळे जिल्हयात काँग्रेसची वाताहत झाली. प्रदेश काँग्रेस देखील अनेक प्रभारी नेमून थकली मात्र जिल्हयात पक्ष वाढू शकला नाही.परिणमत: एकेकाळचा काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या जिल्हयात काँग्रेसला गेल्या दहा निवडणुकात रावेर , जळगाव दोनही मतदारसंघात लोकसभा जिंकता आली नाही. आमदार निवडून पाठवता आले नाहीत . जळगाव सारख्या शहरात एकही नगरसेवक नाही.

१९३६ मध्ये फैजपूर येथे काँग्रेसचे पहिले ग्रामीण अधिवेशन झााले होते. म.गांधींपासून पं. नेहरू , वल्लभ भाई पटेल पर्यंत तत्त्कालीन राष्ट्रीय नेते आले होते.असे असतांना काँग्रेसला आज पर्यंत फैजपूरकाँग्रेसची आठवण झाली नव्हती. या बाबत प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना छेडल्यानंतर फैजपूरला प्रदेश अधिवेशन घेण्याची घोषणा त्यांनी जळगावला केली होती . मात्र अधिवेशन आज पर्यंत होऊ शकले नाही. जिल्हयात काँग्रेसला संजीवनी देण्यासाठी प्रदेश कडून घोषणा झााल्या पण जिल्हयातून प्रतिसाद न मिळाल्याने आज काँग्रेसवर ही स्थिती आली . असे असतांना रावेरची लोकसभेच्या जागेची मागणी काँग्रेस करत आहे. या जागी काँग्रेसला सतत पराभव पत्करावा लागलेला आहे. तरी देखील प्रदेश काँग्रेस जिल्हा नेत्यांच्या प्रेमाखातर या जागेची मागणी करत आहे.काँग्रेस ही जागा जिंकू शकत नाही याची त्यांना जाण देखील आहे.

डॉ. उल्हास पाटील यांना चार वेळा या मतदारसंघात पराभव पत्करावा लागला. आता ते आपली कन्या डॉ केतकी पाटील हिच्यासाठी उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्नशील आहे.आज डॉ. पाटील हे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. दोन वर्षापूर्वी जळगाव जिल्हाध्यक्ष बदलला गेला पण जिल्हा कार्यकारिणीच जाहीर झााली नाही. अखेर २९ उपाध्यक्ष, खजिनदार ४२ सरचिटणीस , ५१ चिटणीस , निमंत्रित अशी मोठी कार्यकारिणी जाहीर केली गेली. मात्र, ही जागा जिंकायची असेल तर भाजपा शिवाय पर्याय नाही हे लक्षात आले आहे. त्यामुळे भाजपाचे विनय सहस्त्रबुध्दे यांच्या माध्यमातून डॉ. उल्हास पाटील व कन्या केतकी पाटील भाजपात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चाआहे. केतकी पाटील यांना काँग्रेसचे तिकीट मागत असतांनाच त्याच भाजपात जात असल्याचे काँग्रेसच्या लक्षात आले आणि प्रदेशने जाहीर केलेली कार्यकारिणीला स्थगिती दिली.

logo
marathi.freepressjournal.in