'मोदी परिवार', 'मोदी की गॅरंटी'विरुद्ध काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

समाज माध्यमांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पत्रही टाकण्यात आले आहे, पंतप्रधानांच्या लेटरहेडचा प्रचारासाठी कसा वापर होऊ शकतो, जो समूह हे वितरीत करीत आहे त्यांच्यावर कारवाई करावी, असेही काँग्रेसने तक्रारीमध्ये म्हटले आहे.
'मोदी परिवार', 'मोदी की गॅरंटी'विरुद्ध काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

नवी दिल्ली : 'मोदी परिवार' आणि 'मोदी की गॅरंटी'च्या जाहिरातींबाबत काँग्रेस पक्षाने गुरुवारी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. या जाहिराती त्वरित हटवाव्यात आणि या जाहिरातींमागे जे कोण आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. या जाहिरातींसाठी सरकारी स्रोतांचा गैरवापर केला जात असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. काँग्रेसचे नेते मुकुल वासनिक, सलमान खुर्शीद आणि सुप्रिया श्रीनाते यांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी निवडणूक आयोगाची भेट घेतली आणि त्यांच्याकडे यासंदर्भात आलेल्या तक्रारी सुपूर्द केल्या व यामुळे आचारसंहितेचा भंग होत असल्याने संबंधितांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी केली.

'मोदी परिवार' जाहिरातीमधून सरकारी स्रोतांचा कसा गैरवापर होत आहे ते अधोरेखित होत असल्याने ती जाहिरातही हटविण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. सशस्त्र दलांचा निर्लज्जपणे वापर केल्याने निवडणूक आयोगाच्या अनेक आदेशांचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे या जाहिराती हटवाव्या आणि दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. समाज माध्यमांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पत्रही टाकण्यात आले आहे, पंतप्रधानांच्या लेटरहेडचा प्रचारासाठी कसा वापर होऊ शकतो, जो समूह हे वितरीत करीत आहे त्यांच्यावर कारवाई करावी, असेही काँग्रेसने तक्रारीमध्ये म्हटले आहे.

दिल्ली मेट्रोवर 'मोदी की गॅरंटी'च्या जाहिराती भाजपने दिल्या आहेत, त्याचप्रमाणे पेट्रोल पंप, कार्यालये अशा विविध ठिकाणी नरेंद्र मोदी यांची छायाचित्रे असलेल्या जाहिराती आहेत त्याही हटविण्याची मागणी करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in