संकटात सापडलेल्या काँग्रेस पक्षाला अखेर जाग;अध्यक्षपदाची निवडणूक १७ ऑक्टोबरला होणार

काँग्रेसचे ज्येष्ठ आणि निष्ठावंत नेते गुलाम नबी आझाद यांनी नुकताच पक्षाचा राजीनामा दिला आहे
संकटात सापडलेल्या काँग्रेस पक्षाला अखेर जाग;अध्यक्षपदाची निवडणूक १७ ऑक्टोबरला होणार
Published on

एकामागून एक निष्ठावंत नेते पक्ष सोडून निघाल्यानंतर संकटात सापडलेल्या काँग्रेस पक्षाला जाग आली आहे. गेली जवळपास दोन वर्षे अध्यक्षाविना असलेल्या काँग्रेसने पक्षाध्यक्ष निवडणूक जाहीर केली आहे. येत्या १७ ऑक्टोबरला अध्यक्षपदाची निवडणूक होणार असून, १९ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीची रविवारी ऑनलाइन बैठक झाली. त्यानंतर पक्षाच्या मध्यवर्ती निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसुदन मेस्त्री यांनी ही घोषणा केली.

काँग्रेसचे ज्येष्ठ आणि निष्ठावंत नेते गुलाम नबी आझाद यांनी नुकताच पक्षाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देताना त्यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर टीका केली होती. राहुल गांधी हे बालीश असल्याची त्यांनी टीका केली आहे. आझाद हे काँग्रेसच्या ‘जी-२३’चे सदस्य होते. त्यांनी २०२० मध्येच सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षाचा अध्यक्ष बदलण्यासह व्यापक बदल करण्याची गरज व्यक्त केली होती. आझाद यांच्याआधी कपील सिब्बल, अश्वनी कुमार या निष्ठावंत नेत्यांनीही राजीनामा दिला आहे.

या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचे सर्वोच्च संघटन असलेल्या केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाचे नवे अध्यक्ष निवडण्यासाठी बैठक घेण्यात आली. हंगामी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी या वैद्यकीय कारणासाठी परदेशी आहेत. राहुल गांधी आणि प्रियांका गांधीही त्यांच्यासोबत आहेत. त्यामुळे ही बैठक ऑनलाइन घेण्यात आली. २०१९च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस पध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून सोनिया गांधी या पक्षाच्या हंगामी अध्यक्षा आहेत. काँग्रेसने काही दिवसांपूर्वी भारत जोडो यात्रेच्या पार्श्वभूमीवर नवीन अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पुढे ढकलली होती. काँग्रेसने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये जाहीर केले होते की, २१ ऑगस्ट ते २० सप्टेंबर २०२२दरम्यान पक्षाच्या नवीन अध्यक्षाची निवडणूक होईल. त्यानुसार आता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. २२ सप्टेंबरला निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल. उमदेवारी अर्ज दाखल करण्यास २४ सप्टेंबरला सुरुवात होईल, तर ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत असेल. १७ ऑक्टोबरला मतदान होईल, तर १९ ऑक्टोबरला मतमोजणी होऊन अध्यक्ष जाहीर केला जाईल.

राहुल गांधींसाठीच आग्रह राहील - खर्गे

राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले असताना पक्षाचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी मात्र राहुल गांधी यांनाच पक्षाध्यक्ष होण्यासाठी पक्ष आग्रही असेल, असे म्हटले आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही पक्षाध्यक्षपद घेण्यास नकार दिला आहे.

logo
marathi.freepressjournal.in