चीनच्या पंतप्रधानांचे अवघडलेपण

चीन गेल्या काही वर्षांत आफ्रिकेतील देशांत हातपाय पसरत आहे
चीनच्या पंतप्रधानांचे अवघडलेपण

नवी दिल्ली : जी-२० संघटनेच्या नवी दिल्लीतील शिखर परिषदेसाठी आलेले चीनचे पंतप्रधान ली कियांग यांच्यासाठी शनिवार, रविवार हे दोन दिवस भलतेच अवघडलेपणाचे गेले. चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी परिषदेला उपस्थित न राहता ही जबाबदारी कियांग यांच्यावर सोपवली होती. ती निभावताना कियांग यांना बरीच तारेवरची कसरत करावी लागत होती.

रशिया-युक्रेन युद्धासंबंधी चीनची भूमिका, कोरोना महासाथ, दक्षिण चीन समुद्रातील विस्तारवादी धोरण आदी प्रश्नांमुळे जागतिक नेते चीनवर नाराज आहेत. चीनचा महत्त्वाकांक्षी बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह (बीआरआय) प्रकल्पात सहभागी झालेले अनेक देश कर्जबाजारी होऊन त्यातून बाहेर पडत आहेत. कोरोनापश्चात काळात अनेक कंपन्या त्यांचे कारखाने चीनबाहेर हलवत आहेत. अशा अनेक कारणांनी चीन जगाच्या टीकेचा धनी होत असताना जगातील महत्त्वाच्या देशांच्या परिषदेला हजर राहण्याची वेळ त्यांच्यावर आली.

चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह (बीआरआय) प्रकल्पातून इटली बाहेर पडत आहे. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी त्याबाबत कियांग यांच्याजवळ थेट नाराजी नोंदवली. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी ब्रिटनच्या लोकशाहीमध्ये चीनच्या हस्तक्षेपाबद्दल कियांग यांच्याजवळ चिंता व्यक्त केली. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटले की, जिनपिंग बैठकीला आले असते तर बरे झाले असते. पण ते नसतानाही बैठकीचे कामकाज उत्तम चालले आहे.

चीन गेल्या काही वर्षांत आफ्रिकेतील देशांत हातपाय पसरत आहे. त्याला शह देण्यासाठी भारताची मुत्सद्देगिरी उपयुक्त ठरली. भारताने आफ्रिका खंडातील ५५ देशांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या आफ्रिकन युनियन (एयू) या संघटनेला जी-२० संघटनेचे स्तायी सदस्यत्व बहाल करून चीनवर मात केली. या सर्व घडामोडींमुळे जी-२० बैठकीत ली कियांग आणि त्यांच्या शिष्टमंडळाला चांगलेच अवघडल्यासारखे वाटत होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in