निवडणूक आयोगाचा बडगा! मुंबई महापालिका आयुक्त चहल यांच्यासह अतिरिक्त आयुक्त, उपायुक्तांच्या बदल्या करण्याचे आदेश

मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार आणि अन्य दोन आयुक्त ज्ञानेशकुमार व सुखबीरसिंग संधू यांची सोमवारी बैठक झाल्यानंतर बदल्याचे आदेश देण्यात आले आहेत.
निवडणूक आयोगाचा बडगा! मुंबई महापालिका आयुक्त चहल यांच्यासह अतिरिक्त आयुक्त, उपायुक्तांच्या बदल्या करण्याचे आदेश

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर निवडणुका नि:पक्षपाती वातावरणात पार पडाव्यात यासाठी निवडणूक आयोगाने सोमवारी काही कठोर आदेश जारी केले. मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्तांसह अन्य सहा राज्यांच्या गृह सचिवांची आणि पश्चिम बंगालच्या पोलीस महासंचालकांची पदांवरून उचलबांगडी करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत.

गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांच्या गृह सचिवांबरोबरच मिझोराम आणि हिमाचल प्रदेशच्या सामान्य प्रशासन विभागाच्या सचिवांनाही पदांवरून हटविण्याचे आदेश दिले आहेत. इतकेच नव्हे, तर निवडणुकीच्या कामाशी संबंधित असलेले आणि ज्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे अथवा जे त्यांच्या गृह जिल्ह्यातच आहेत, अशा सर्व अधिकाऱ्यांची पदांवरून उचलबांगडी करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने सर्व राज्य सरकारांना दिले आहेत.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार आणि अन्य दोन आयुक्त ज्ञानेशकुमार व सुखबीरसिंग संधू यांची सोमवारी बैठक झाल्यानंतर हे आदेश देण्यात आले आहेत. पश्चिम बंगालचे पोलीस महासंचालक राजीवकुमार यांना २०१६ मध्ये झालेल्या विधानसभा आणि २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांच्या वेळीही निवडणूक व्यवस्थापन संबंधित कामांपासून दूर करण्यात आले होते. राजीवकुमार यांची बिगर निवडणूक कामासाठी नियुक्ती करावी आणि हंगामी व्यवस्था म्हणून त्यांना त्वरित कनिष्ठ असलेल्या अधिकाऱ्याची पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करावी, असे निवडणूक आयोगाने त्या राज्याच्या मुख्य सचिवांना कळविले आहे.

गुजरात, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, बिहार, झारखंड आणि उत्तराखंड या राज्यांच्या गृह सचिवांकडे संबंधित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाचाही कारभार होता. त्यामुळे त्यांना दूर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे अशा प्रकारे पदावर असलेले अन्य महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्त यांनाही पदावरून दूर करण्याचे आदेश राज्यांच्या मुख्य सचिवांना दिले आहेत.

निवडणुका नि:पक्षपातीपणे पार पडाव्या आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता अबाधित राहावी यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. ज्या अधिकाऱ्यांनी तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे, अथवा जे गृह जिल्ह्यातच आहेत अशा निवडणुकीशी संबंधित अधिकाऱ्यांची बदली करण्याचे आदेश निवडणूक आयोगाकडून निवडणुकीपूर्वी सर्वसाधारणपणे दिले जातात.

आदेश डावलल्याने आयोगाची नाराजी

काही महापालिकांचे आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्त यांच्याबाबत महाराष्ट्र सरकारने आदेशांचे पालन केलेले नाही. याबाबत राज्याच्या मुख्य सचिवांकडे तीव्र नाराजी व्यक्त करून आयोगाने मुंबई महापालिकेचे आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्त यांची सोमवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत बदली करावी, असे आदेश दिले आहेत.

अश्विनी भिडे, पी. वेलरासू यांच्याही बदलीचे आदेश

मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. चहल यांच्यासह अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे व पी. वेलरासू यांच्याही बदलीचे आदेश निवडणूक आयोगाने फेब्रुवारी अखेर दिले होते. मात्र, त्यावर अद्याप निर्णय राज्य सरकारने घेतला नाही. भिडे यांच्याकडे सागरी किनारा मार्गाची जबाबदारी आहे, तर वेलरासू यांच्याकडे रस्ते काँक्रीटीकरण, गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता, नि:क्षारीकरण प्रकल्प आदी महत्त्वाचे प्रकल्प आहेत.

चहल यांची बदली अटळ

केंद्रीय निवडणूक आयोगाने डॉ. इक्बाल सिंह चहल यांना आयुक्त पदावरून हटवण्याचे आदेश राज्य सरकारला सोमवारी दिल्याने चहल यांची बदली अटळ असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. मुंबई महापालिकेत एका विभागात तीन वर्षे काम केल्यानंतर आयुक्त, अतिरिक्त आयुक्त व पालिकेच्या अन्य विभागातील संबंधितांची बदली दुसऱ्या विभागात केली जाते. कोरोना काळात म्हणजे ८ मे २०२० रोजी डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी पालिका आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारली. आयुक्तपदी चहल यांना चार वर्षे होत आल्याने आयुक्तांची बदली करावी, असे आदेश निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिले होते. मात्र, आयुक्त व अतिरिक्त आयुक्त हे थेट निवडणूक प्रक्रियेत सहभागी होत नसल्याने त्यांच्या बदलीचे आदेश वगळावेत, असे विनंती करणारे पत्र राज्य सरकारने केंद्रीय निवडणूक आयोगाला दिले होते.

मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य सरकारची ही मागणी फेटाळली. त्यामुळे मंगळवार सकाळपर्यंत चहल यांच्यासह दोन अतिरिक्त आयुक्त व उपायुक्त यांच्या बदलीचे आदेश राज्य सरकार काढणार असल्याचे समजते. चहल यांचा तीन वर्षाचा कालावधी ८ मे २०२३ रोजी संपला असून येत्या ८ मे २०२४ मध्ये त्यांना महापालिका आयुक्तपदी चार वर्षे पूर्ण होणार आहेत.

विवेक सहाय पश्चिम बंगालचे नवे पोलीस महासंचालक

निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालचे पोलीस महासंचालक राजीवकुमार यांची पदावरून उचलबांगडी करण्याचे आदेश दिल्यानंतर सोमवारी राज्य सरकारने विवेक सहाय यांची राज्याचे नवे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती केली आहे. सुरक्षा संचालक या पदावर असताना २०२१ मध्ये निवडणूक आयोगाने सहाय यांना निलंबित केले होते. विवेक सहाय हे १९८८च्या तुकडीचे भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी आहेत, त्यांनी यापूर्वी गृहरक्षक दलाचे महासंचालक आणि कमांडंट जनरल या पदावर काम केले आहे. गेल्या डिसेंबर महिन्यात राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेले राजीवकुमार यांची माहिती-तंत्रज्ञान विभागात वर्णी लावण्यात आली आहे. त्या विभागातील काम निवडणुकीशी संबंधित नाही. मात्र, ही अंतरिम व्यवस्था आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

logo
marathi.freepressjournal.in