‘विकसित भारत’चे संदेश त्वरित थांबवा! निवडणूक आयोगाचे आदेश

आचारसंहिता १६ मार्च रोजी लागू झाली त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पत्र आणि त्याबरोबर संदेश पाठविण्यात आले, असे मंत्रालयाने निवडणूक आयोगाला सांगितले.
‘विकसित भारत’चे संदेश त्वरित थांबवा! निवडणूक आयोगाचे आदेश
Published on

नवी दिल्ली : 'विकसित भारत'च्या संदेशाद्वारे सरकारची कामगिरी अधोरेखित करणारे एकगठ्ठा संदेश व्हॉट्सॲपवर पाठविले जात आहेत ते त्वरित थांबविण्याचे आदेश निवडणूक आयोगाने गुरुवारी केंद्र सरकारला दिले.

याबाबत निवडणूक आयोगाकडे मोठ्या प्रमाणावर तक्रारी आल्यानंतर आयोगाने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयास हे आदेश दिले आहेत. निवडणुका नि:पक्षपाती वातावरणात पार पडाव्या यासाठी निवडणूक आयोगाने अनेक निर्णय घेतले असून वरील आदेश हा त्याचाच एक भाग आहे. या आदेशाचे पालन करण्यात आले असल्याचा अहवाल आपल्याला सादर करावा, अशा सूचनाही आयोगाने मंत्रालयास दिल्या आहेत.

आचारसंहिता १६ मार्च रोजी लागू झाली त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पत्र आणि त्याबरोबर संदेश पाठविण्यात आले, असे मंत्रालयाने निवडणूक आयोगाला सांगितले. मात्र, काही तांत्रिक मर्यादांमुळे त्या पुन्हा पाठविल्या गेल्या असल्याची शक्यता आहे, असेही मंत्रालयाने म्हटले आहे.

आचारसंहितेचा भंग होत असल्याच्या तक्रारीनंतर कारवाई

आचारसंहिता जारी झाली असतानाही सरकारची कामगिरी अधोरेखित करणारे संदेश अद्यापही नागरिकांच्या व्हॉट्सॲपवर पाठविले जात असल्याच्या अनेक तक्रारी निवडणूक आयोगाकडे करण्यात आल्याने हे आदेश आयोगाने दिले.

logo
marathi.freepressjournal.in