शिमला : हिमाचल प्रदेशमध्ये रविवारपासून झालेल्या पावसाच्या बळींची संख्या ७५ वर पोहोचली असून, राज्य सरकारने संपूर्ण राज्याला आपत्तीग्रस्त प्रदेश म्हणून जाहीर केले आहे.
हिमाचल प्रदेशमध्ये रविवारपासून जोरदार पाऊस झाला आहे. राज्यात ठिकठिकाणी ढगफुटी, भूस्खलन, दरडी कोसळणे, डोंगर खचणे, रस्ते वाहून जाणे असे प्रकार घडले आहेत. नद्यांना पूर आला असून, शेकडो एकर जमीन पाण्याखाली गेली आहे. रविवारपासून झालेल्या अतिवृष्टीने ७५ बळी घेतले आहेत. त्यापैकी २२ जणांचा मृत्यू शिमला येथे तीन भूस्खलनाच्या घटनांमध्ये झाला आहे.
राज्यात २४ जून रोजी पावसाला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत २१७ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील ११,३०१ घरांचे पूर्णत: किंवा अंशत: नुकसान झाले आहे. अनेक जनावरे वाहून गेली आहेत. पाणी साचल्यामुळे राज्यातील ५०६ रस्ते अद्याप वाहतुकीसाठी बंद आहेत. विजेचे ४०८ ट्रान्स्फॉर्मर्स आणि १४९ पाणीपुरवठा योजना बंद आहेत. आर्थिक नुकसानही अतोनात झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने शुक्रवारी संपूर्ण राज्यालाच आपत्तीग्रस्त क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे.