‘निर्भयां’चे भय संपेना ;११ वर्षांनंतर निर्भयाच्या आईची खदखद

महिलांविरोधातील अत्याचाराचे खटले १० ते १२ वर्षे अडकले आहेत.
‘निर्भयां’चे भय संपेना ;११ वर्षांनंतर निर्भयाच्या आईची खदखद
PM

नवी दिल्ली : १६ डिसेंबर २०१२ रोजी राजधानी दिल्लीत २३ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार होऊन तिची हत्या झाली. संपूर्ण देश या हत्येने सुन्न झाला होता. या बलात्कार व हत्येला उद्या ११ वर्षे पूर्ण होणार आहेत. या ११ वर्षांत काहीच बदललेले नाही. महिलांविरोधातील अत्याचाराचे खटले १० ते १२ वर्षे अडकले आहेत. मात्र, आम्हाला प्रत्येकाच्या सहकार्याने न्याय मिळाला, असे मत ‘निर्भया’च्या आईने व्यक्त केले.

१६ डिसेंबर २०१२ रोजी दक्षिण दिल्लीत चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार झाला. त्यानंतर मारहाण करून तिला बसबाहेर फेकून देण्यात आले. तिच्यावर सिंगापूरच्या माऊंट एलिझाबेथ रुग्णालयात उपचार करण्यात आले. तेथे तिचा २९ डिसेंबर २०१२ रोजी मृत्यू झाला.

या हत्येतील सहा आरोपींपैकी एकाने आत्महत्या केली, तर चौघांना २० मार्च २०२० मध्ये फाशी देण्यात आली. निर्भयाचे वडील बद्रीनाथ सिंह म्हणाले की, जेव्हा महिलेवर बलात्कार होतो तेव्हा तिच्या बाजूने कोणीही उभे राहत नाही. माझ्या मुलीच्यावेळी संपूर्ण देश एकदिलाने उभा राहिल्याने आम्हाला न्याय मिळाला. जलदगती न्यायालयाने आम्हाला मदत केली.

बद्रीनाथ म्हणाले की, निर्भयाला जो न्याय मिळाला तो प्रत्येकाला मिळणार नाही. नववर्षी अंजलीच्या बाबत काय झाले. तपासाच्यावेळी आरोपी दारूच्या नशेत होता. माझ्या मुलीच्या प्रकरणात अनेक महिलांनी आंदोलन केले. तेव्हा त्यांच्यावर पाण्याच्या तोफेने मारा करण्यात आला. जनतेने त्या काळात जोरदार आंदोलन केले. मात्र अजूनही काहीही बदलले नाही.

२०२२ मध्ये अंजली सिंगबाबत घडलेली घटना हादरवणारी आहे. अंजली ही इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत काम करत होती. ३१ डिसेंबर २०२२ च्या रात्री तिला कारने १२ किमी फरफटत नेले. ती जबर जखमी झाली. मी तिच्या आईची भेट घेतली. तिच्या आईची प्रकृती चांगली नव्हती. अंजली ही तिच्या घरातील एकमेव कमावती व्यक्ती होती.

निर्भयाच्या आईने सांगितले की, सर्व यंत्रणा योग्यरीतीने चालली पाहिजे. त्यात बदल होणे गरजेचे असून निर्धारित कालावधीत न्याय मिळायला हवा. तसेच पोलिसांनी योग्यरीतीने काम केले पाहिजे.

काहीही बदललेले नाही

‘निर्भया’ची आई आशा देवी म्हणाल्या की, महिलांविरोधातील गुन्हे अजूनही थांबलेले नाहीत. अनेक कायदे तयार झाले, मात्र काहीही बदललेले नाही. काही बदल झाला नसल्याचे पाहून आम्ही व्यथित होतो. अनेक घटना आमच्यासमोर येतात. मात्र नैतिक पाठिंब्याशिवाय आम्ही काहीही करू शकत नाही, असे त्या म्हणाल्या.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in