कालचक्र बदलतेय! हजार वर्षांनंतरच्या समर्थ, भव्य भारत निर्माणाचा पाया -मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सोमवारी अयोध्येत रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली.
कालचक्र बदलतेय! हजार वर्षांनंतरच्या समर्थ, भव्य भारत निर्माणाचा पाया -मोदी

अयोध्या : “प्रभू रामचंद्रांनी रामसेतू बांधण्यास सुरुवात करून कालचक्र बदलले. मी काल त्याच रामसेतूच्या आरंभबिंदूवर होतो. तेथे माझ्या अंतरंगात एक विश्वास जागा झाला आहे. त्याकाळी जसं कालचक्र बदललं होतं, तसंच आताही बदलणार आहे. अयोध्येत प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर तर बनले, आता पुढे काय? शतकांपासूनची प्रतीक्षा संपली, आता पुढे काय, असा प्रश्न करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील हजार वर्षांनंतरच्या भारताचा पाया रचला आहे. समर्थ, सक्षम, भव्यदिव्य भारत निर्माणाची आज आपण शपथ घेऊ या. भारताची वेळ आता सुरू झाली आहे,” असे सुतोवाच मोदींनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सोमवारी अयोध्येत रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली. यावेळी राम मंदिराच्या गर्भगृहात मोदी यांच्यासह उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गर्भगृहात अभिषेक सोहळा झाला. त्यानंतर दुपारी बरोबर १२ वाजून २९ मिनिटांनी रामलल्लाच्या मूर्तीच्या डोळ्यांवरील पिवळे वस्त्र काढण्यात आले. त्यानंतर रामलल्लाच्या मूर्तीचे प्रत्यक्ष दर्शन घडले. या सोहळ्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना मोदी म्हणाले, “आज मी पवित्र मनाने अनुभूती घेत आहे की, कालचक्र बदलत आहे. आमच्या पिढीला एका विशेष कामासाठी निवडले गेले आहे. हजार वर्षांनंतरची पिढी राष्ट्रनिर्माणाच्या आजच्या कामांचे स्मरण करेल. म्हणून मी सांगतो, हीच ती योग्य वेळ आहे. आम्हाला आजपासून पुढच्या हजारो वर्षांच्या भारताचा पाया रचायचा आहे. मंदिर निर्माणाच्या पुढे जाऊन सर्व नागरिकांनी समर्थ, सक्षम, भव्यदिव्य भारत निर्माणाची शपथ घेऊया”, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले.

पंतप्रधान मोदी म्हणाले, “प्रभू श्रीरामाचे विचार जनमानसात रुजवावेत, हीच राष्ट्रनिर्माणाची पायरी आहे. आपल्या चेतनाचा विस्तार करावा लागेल. देवापासून देशाकडे आणि रामापासून राष्ट्राकडे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे करत असताना हनुमानाची निष्ठा, त्यांची सेवा, समर्पण हे गुण आपल्याला घ्यावे लागतील. प्रत्येक भारतीयामध्ये भक्ती, सेवा आणि समर्पणाचे भाव सक्षम भारताचा आधार बनतील. आज देशात निराशेला अजिबात स्थान नाही. मी खूप लहान आहे, छोटा आहे, असा विचार जर कुणी करत असेल, तर त्याने खारीच्या योगदानाची एकदा आठवण करावी. खारीने दिलेले योगदानच आपल्याला प्रेरणा देईल. व्यक्ती छोटी अशी किंवा मोठी, तिच्या योगदानाचे महत्त्व वेगळे असते.’’

भारताचा पुढील काळ उज्ज्वल असणार आहे, अशी आशा व्यक्त करताना मोदी म्हणाले, भारताची वेळ आता सुरू झाली आहे. शतकांच्या संघर्षानंतर आम्ही इथे पोहोचलो आहोत. आता आम्ही थांबणार नाही. विकासाच्या शिखरावर जाऊनच आपण थांबायचे आहे. राम मंदिर निर्माण झाले आहे, याबद्दल मी सर्वांना शुभेच्छा देतो.

राम आग नाही ऊर्जा आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “एक काळ असा होता की, लोक म्हणायचे की राम मंदिर तयार झालं तर आग लागेल. असे लोक भारताच्या सामाजिक भावनेतील पावित्र्य ओळखत नाहीत. श्रीरामाच्या मंदिराचे बांधकाम हे भारतीय समाजाच्या शांतता, संयम, परस्पर सौहार्द आणि समन्वयाचे प्रतीक आहे. या बांधकामामुळे आग नाही तर ऊर्जेला जन्म देत आहे. हे मंदिर केवळ देवाचे मंदिर नसून ते भारताच्या दृष्टीचे, भारताच्या तत्त्वज्ञानाचे, भारताचे मार्गदर्शक आणि रामाच्या रूपातील राष्ट्रीय चेतनेचे मंदिर आहे. राम आग नाही, राम ऊर्जा आहे. राम विवाद नाही, राम समाधान आहे. राम फक्त वर्तमान नाही, राम अनंत काळ आहे.”

प्रभू श्रीरामाची माफी मागतो

‘‘माता जानकी, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न या सगळ्यांनाही मी नमन करतो. दिव्य चेतना आपल्या शेजारी आहेत, असं वाटत आहे. मी त्यांनाही नमन करतो आहे. आज मी प्रभू श्रीरामाची माफीही मागतो. आमचा पुरुषार्थ, त्याग आणि तपस्येत काहीतरी कमतरता राहिली असेल. त्यामुळेच आपण इतकी युगे मंदिर निर्माण करू शकलो नाही. आज ती कमतरता आपण भरून काढली आहे. मला विश्वास आहे की, प्रभू राम आज आपल्याला माफ करतील,’’ असे मोदी म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in