श्रीमंत व गरीब यांच्यातील दरी वाढतेय; लोकसभेत काँग्रेसचा मोदी सरकारवर घाणाघात

बचत, गुंतवणूक, उत्पादन, वस्तूंचा खप, रोजगार हे पाच अर्थव्यवस्थेचे खांब आहेत
श्रीमंत व गरीब यांच्यातील दरी वाढतेय; लोकसभेत काँग्रेसचा मोदी सरकारवर घाणाघात

देशातील महागाईला भाजप सरकारची धोरणे कारणीभूत असल्याची जोरदार टीका काँग्रेसने लोकसभेत सोमवारी केली आहे. या महागाईचा फटका २५ कोटी कुटुंबांना बसत असून, श्रीमंत व गरीब यांच्यातील दरी वाढत आहे, असे सांगून काँग्रेसने सरकारला धारेवर धरले.

लोकसभेत महागाईच्या मुद्द्यावर चर्चा झाली. त्यावेळी काँग्रेसचे खा. मनीष तिवारी म्हणाले, ‘‘बचत, गुंतवणूक, उत्पादन, वस्तूंचा खप, रोजगार हे पाच अर्थव्यवस्थेचे खांब आहेत; मात्र केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे हे खांबच कोसळत आहेत.”

अब्जाधीशांची संख्या वाढली

“भाजप सरकारच्या काळात देशातील अब्जाधीशांची संख्या वाढताना दिसत आहे. ही संख्या १००वरून १४२ वर गेली आहे. गरिबांचे उत्पन्न दिवसेंदिवस कमी होत आहे. देशातील ७७ टक्के संपत्ती एक टक्का लोकांच्या हातात आहे, तर ९२ अतिश्रीमंतांची संपत्ती ५५ कोटी भारतीयांच्या संपत्तीइतकी आहे,” असे तिवारी म्हणाले.

भारतात मोठ्या प्रमाणावर विषमता वाढीस लागली आहे. कोविड-१९ महासाथीचा मोठा परिणाम देशाच्या आर्थिक परिस्थितीवर झाला आहे; मात्र तत्पूर्वी सरकारने २०१६ मध्ये केलेल्या नोटाबंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था कमकुवत होऊ लागली.

महिला खासदाराने कच्चे वांगे खाल्ले

तृणमूल काँग्रेसच्या खासदार काकोली घोष दस्तीदार यांनी महागाईच्या चर्चेच्या वेळी कच्चे वांगे खायला सुरुवात केली. “गॅसच्या किमती वाढल्या असून, सर्वसामान्यांना जेवण बनवणे कठीण बनले आहे. आम्ही कच्च्या भाज्या खायच्या का? असे सरकारला वाटते का?” असा प्रश्न त्यांनी विचारला.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in