
अन्नधान्याच्या दरात घसरण झाल्याने किरकोळ महागाईदर मेमध्ये घसरुन ७.०४ टक्के झाल्याने सरकारला दिलासा मिळाला आहे. तथापि, हा दर रिझर्व्ह बँकेच्या उद्दिष्ट पातळीवर सलग पाचव्या महिन्यात राहिला असल्याचे सरकारने सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीवरुन दिसून येते.
ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय) आधारित महागाईदर एप्रिलमध्ये ७.७९ टक्के होता. तर मे २०२१ मध्ये हा दर ६.३ टक्के होता.
अन्नधान्याचा महागाई दर मे २०२२मध्ये ७.९७ टक्के राहिला असून मागील महिन्याच्या ८.३१ टक्क्यांच्या तुलनेत त्यात किंचित घसरण झाली, असे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ)ने जाहीर केलेल्या आकडेवारीवरुन दिसून येते.
रिझर्व्ह बॅंकेने या महिन्याच्या प्रारंभी द्वैमासिक पतधोरण जाहीर करताना चालू आर्थिक वर्षात महागाईदर ७.५ टक्के आणि पुढील तीन महिने ७.४ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता. तसेच तिसऱ्या आणि चौथ्या तिमाहीत महागाई दरात घट होऊन तो अनुक्रमे ६.२ टक्के आणि ५.८ टक्के राहण्याची अपेक्षा रिझर्व्ह बँकेने व्यक्त केली आहे. सरकारने रिझर्व्ह बँकेला महागाईदर चार टक्के राहील. तसेच तो अधिक दोन टक्के किंवा उणे दोन टक्के राहील, असे उद्दिष्ट दिले आहे.