नवी दिल्ली : महागाईपासून सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी सरकार टोमॅटो स्वस्त दरात देत आहे. आता २५ रुपये किलोने कांदा विकण्याचे सरकारने ठरवले आहे. २१ ऑगस्टपासून कांद्याची विक्री सुरू होणार आहे. ही विक्री ‘एनसीसीएफ’द्वारे केली जाणार आहे.
शनिवारी सरकारने कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के शुल्क लावण्याचा निर्णय घेतला. कांद्याच्या दरात वाढ होत असल्याने सरकारने तातडीने पावले उचलली आहेत. कारण टोमॅटोनंतर कांदाही जनतेच्या अडचणी वाढवू शकतो. सप्टेंबरपासून त्याच्या दरात वाढ होऊ शकते. त्यामुळे सरकारने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून विविध निर्णय घेतले आहेत. कारण आता सणांचा काळ सुरू होत आहे. त्यामुळे जनतेला महागाईचा सामना करावा लागू नये, म्हणून सरकारने ही पावले उचलली.
कांद्याचा राखीव साठा ५ लाख टनावर
कांद्याचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी सरकारने कांद्याचा राखीव (बफर) साठा ३ लाख टनावरून ५ लाख टनावर गेला आहे. सरकारने एनसीसीएफ व नाफेड या दोघांना अतिरिक्त एक-एक लाख टन कांदा खरेदी करायला सांगितला आहे.
राखीव साठ्यातून कांदा विक्री सुरू
सरकारने राखीव साठ्यातून कांदा बाजारात पाठवणे सुरू केले आहे. आतापर्यंत १४०० टन कांदा बाजारात आला आहे. देशातील बाजारात कांद्याची मागणी पूर्ण करण्यासाठी व उपलब्धता राखण्यासाठी वापरला जाणार आहे.
टोमॅटोच्या दराने केले हैराण
देशातील नागरिक टोमॅटोच्या दराने हैराण झाले आहेत. देशाच्या विविध शहरात टोमॅटोचे दर २०० ते २५० रुपये किलोवर गेले होते. त्यानंतर एनसीसीएफ व नाफेडने स्वस्त दरात टोमॅटो विकायला सुरुवात केली. पहिल्यांदा टोमॅटो ९० रुपये किलोने विकले जात होते. आता ४० रुपये किलोने टोमॅटो विकले जात आहेत.
मिझोराममध्ये कांदा ६३ रुपये
ग्राहक संरक्षण खात्याच्या आकडेवारीनुसार, कांद्याची देशातील सरासरी किंमत ३०.७२ रुपये होती, तर मिझोराम राज्यातील चंफई येथे कांदा ६३ रुपयांनी विकला जात होता.