मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा शासन निर्णय अखेर जारी

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा केंद्र सरकारचा शासन निर्णय अखेर जारी झाला.
मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा शासन निर्णय अखेर जारी
छायाचित्र - एक्स
Published on

नवी दिल्ली : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा केंद्र सरकारचा शासन निर्णय अखेर जारी झाला. दीर्घकाळापासून करण्यात आलेल्या मागणीची दखल घेत केंद्राने ३ ऑक्टोबर २०२४ रोजी मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची घोषणा केली होती. मात्र, तीन महिने उलटूनही शासन आदेश जारी करण्यात आला नसल्याने निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. केंद्रीय सांस्कृतिकमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या हस्ते उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे अभिजात दर्जाबाबतचा शासन आदेश सुपूर्द करण्यात आला. त्यामुळे आता मराठी भाषा ही अधिकृतपणे अभिजात भाषा ठरली आहे.

अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर जे काही लाभ मिळतात, ते मिळवण्यासाठी आम्ही तातडीने प्रस्ताव सादर करणार आहोत. केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांच्या हस्ते मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणारा शासन निर्णय स्वीकारल्यानंतर उदय सामंत यांनी महाराष्ट्रातील जनतेच्यावतीने तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांचे आभार मानले.

दरम्यान, मराठी भाषेतील काम साहित्यिकांना विश्वासात घेऊन केले जाईल. साहित्य संमेलनाला २ कोटींचा निधी देण्याचा निर्णय मागच्या वर्षी घेण्यात आला आहे. त्याप्रमाणे यावर्षीही तो निधी देण्यात येईल. दिल्ली आणि अन्य भागात मराठी शाळा आहेत. त्या शाळा सक्षम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न करणार आहोत, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in