
नवी दिल्ली : रोजच्या जेवणात लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडलेले असतानाच मोदी सरकार मात्र महागाई नियंत्रणात आल्याचा दावा का करत आहे, असा सवाल काँग्रेसने विचारला आहे. ही भडकलेली महागाई कमी करण्यासाठी व विशेष म्हणजे वाहतूक खर्च कमी करायला कोणतीच पावले मोदी सरकार का उचलत नाही, असा प्रश्न काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी केला आहे.
रोजच्या जेवणात लागणाऱ्या टोमॅटोपासून हिरव्या मिरचीपर्यंत, आल्यापासून लसणापर्यंत प्रत्येक जीवनावश्यक वस्तू महागली आहे. तरीही सरकार ढिम्म हलत नाही. टोमॅटो १४० ते १५० रुपये किलो, हिरवी मिरची ४०० रुपये किलो, आले ४०० रुपये किलो, लसूण २०० रुपये किलोवर पोहचले आहेत. या महागाईला केवळ वातावरणाचे कारण नाही, तर वाहतूक खर्च मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. त्यामुळे यात सरकारने हस्तक्षेप करणे गरजेचे बनले आहे. सरकारने जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी काँग्रेसने केली.
मसाल्याचे पदार्थ, डाळी महाग
जिरे काही महिन्यांपूर्वी २०० रुपये किलो होते. ते आता ८०० रुपये किलो झाले आहे. तूर व उडीद डाळ १६० ते १८० रुपये किलोवर गेली आहे. ब्रँडेड डाळी तर आणखीन महाग झाल्या आहेत. गव्हाच्या किमतीही वाढल्या आहेत. या महागाईने मध्यमवर्ग, दारिद्र्यरेषेखालील व्यक्तीचे काय होत असेल. ही महागाई कमी करायला सरकारकडे काय योजना आहे? असा सवाल काँग्रेसने केला.
पार्ले-जी बिस्कीटचा पुडा देशात कुठेही मिळतो. पूर्वी ५ रुपयाच्या पुड्याचे वजन ८० ग्रॅम होते ते आता ५० ग्रॅमवर आले आहे. पूर्वी चहाची पत्ती २५० ग्रॅम ५० रुपयांना मिळत होती, तर आता २०० ग्रॅमची किंमत ७० रुपये झाली. नमकीन बिस्कीट पूर्वी १० रुपयांना ६५ ग्रॅमचा पुडा मिळत होता, तो आता ३२ ग्रॅमचा झाला. शेंगदाणे १० रुपयांना ५५ ग्रॅम मिळत होते. आता १० ग्रॅमचा ३४ ग्रॅमचे पाकीट येते. चॉकलेट सर्वांना आवडते. पूर्वी याची किंमत ५ रुपये होती ती आता १० रुपये झाली आहे. वस्तूच्या किमती ५० पैशांनी नव्हे तर दुप्पट महाग झाल्या आहेत.
कॉफीचे पाकीट पूर्वी ७ ग्रॅमला दहा रुपये होते. आता १० रुपयाला साडेपाच ग्रॅम कॉफी येते. पूर्वी ९५० ग्रॅम सॉसची किंमत १०० रुपये होती. आता ८५० ग्रॅमचे पाकीट १०० रुपयांना मिळते. एवढी महागाई होऊन सरकार पूर्णपणे बेफिकीर आहे. सर्वसामान्य माणसाला किंवा महिलांना काय भोगावे लागत आहे, याच्याशी सरकारला काहीही देणेघेणे नाही.