काँग्रेसवर ‘आयटी’ नोटिशींचा भडिमार; एकूण ३,५६७ कोटींच्या करासाठी काँग्रेसला नोटिसा

भाजप नेत्यांच्या डायरीमध्ये त्रयस्थ नोंदी सापडल्या आहेत. त्यांच्यावर कधीही कर लावला नाही. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मुख्य सरकारी संस्थांना हाताशी धरून विरोधी पक्षांना आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्यासाठीच भाजप या कारवाया करत आहे.
काँग्रेसवर ‘आयटी’ नोटिशींचा भडिमार; एकूण ३,५६७ कोटींच्या करासाठी काँग्रेसला नोटिसा
Published on

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक सुरू असतानाच काँग्रेस मोठ्या अडचणीत सापडली आहे. प्राप्तिकर विभागाने काँग्रेसला २०१४-१५ ते २०१६-१७ दरम्यानच्या १,७४५ कोटी रुपयांच्या करासाठी नवीन नोटीस बजावली आहे. या नव्या नोटिशीमुळे प्राप्तिकर विभागाने आतापर्यंत काँग्रेसकडे एकूण ३,५६७ कोटी रुपयांची मागणी केली.

सूत्रांनी सांगितले की, २०१४-१५ चे ६६३ कोटी, २०१५-१६ चे ६६४ कोटी व २०१६-१७ चे ४१७ कोटींची कर मागणी प्राप्तिकर विभागाने केली आहे. राजकीय पक्षांना कर सवलत बंद करण्यात आली आहे. पक्षाच्या एकूण जमा रकमेवर पक्षांना कर द्यावा लागतो. काँग्रेसच्या नेत्यांच्या डायरीतील त्रयस्थ नोंदीमुळे त्यांच्यावर छापेमारी करण्यात आली. त्यामुळे त्यांना हा कर भरावा लागणार आहे.

काँग्रेसने शुक्रवारी सांगितले की, प्राप्तिकर विभागाकडून आम्हाला नोटीस मिळाली असून १,८२३ कोटींचा कर भरणा करायला सांगितले. प्राप्तिकर खात्याने यापूर्वीच १३५ कोटी रुपये कर पक्षाच्या बँक खात्यातून काढून घेतले आहेत. या कारवाईविरोधात काँग्रेसने न्यायालयात धाव घेतली आहे. सोमवारी सुप्रीम कोर्टात याबाबत सुनावणी होणार आहे. कारण हायकोर्टात पक्षाला याबाबत दिलासा मिळाला नाही.

भाजप नेत्यांच्या डायरीमध्ये त्रयस्थ नोंदी सापडल्या आहेत. त्यांच्यावर कधीही कर लावला नाही. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मुख्य सरकारी संस्थांना हाताशी धरून विरोधी पक्षांना आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्यासाठीच भाजप या कारवाया करत आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली असून, सर्व राजकीय पक्षांमध्ये समतोल राखला जावा यासाठी विनंती केली आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in