नवी दिल्ली : गेल्यावर्षी पावसाने ओढ दिल्यानंतर देशाच्या विविध भागात सध्या दुष्काळाचे सावट पसरले आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने शेतकरी व सर्वसामान्यांसाठी खुशखबर दिली आहे. यंदा मान्सून जून ते सप्टेंबरदरम्यान धो-धो कोसळणार आहे, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने जाहीर केला आहे. मान्सून यावर्षी १०४ ते ११० टक्के बरसणार असून शेतीसाठी हा पाऊस उपयुक्त ठरणार आहे.
यंदा २०२४ मध्ये १०६ टक्के म्हणजे ८७ सेंटीमीटर पाऊस होऊ शकतो. ४ महिन्यांच्या मान्सून सिझनसाठी पावसाचा दीर्घकालीन अंदाज ८६.८६ सेंटीमीटर आहे. म्हणजेच मान्सूनच्या संपूर्ण काळात इतका पाऊस पडला पाहिजे, अशी अपेक्षा आहे.
यापूर्वी ९ मार्च रोजी खासगी हवामान संस्था ‘स्कायमेट’ने सामान्य पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. जून ते सप्टेंबरदरम्यान ९६ ते १०४ टक्के पाऊस होऊ शकेल, असे त्यांनी जाहीर केले आहे.
२० राज्यांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस
यंदा २० राज्यांत सामान्य ते जास्त पाऊस पडणार आहे. केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, चंदिगड, हरयाणा, दिल्ली, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, सिक्कीम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, पुड्डुचेरी, अंदमान निकोबार द्वीपसमूह, लक्षद्वीप, दादरा व नगर हवेली, दमण-दीव या राज्यांमध्ये चांगला पाऊस होईल, तर छत्तीसगड, हिमाचल, जम्मू-काश्मीर आणि लडाख येथे सामान्य पाऊस होईल. तर ओदिशा, आसाम, नागालँड, मणिपूर, मिजोरम आणि त्रिपुरामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल.
जून-जुलैमध्ये पावसाची ओढ
यंदा जून, जुलैमध्ये कमी पाऊस पडेल, तर ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये जोरदार पाऊस होणार आहे. मेच्या शेवटच्या आठवड्यात हवामान खात्याकडून मान्सूनबाबत अखेरचा अंदाज व्यक्त केला जाणार आहे. दरम्यान, हवामान बदलामुळे जोरदार पाऊस होण्याचे दिवस कमी होत आहेत, तर कमी वेळात अधिक पाऊस होण्याचे दिवस वाढत आहेत. त्यामुळे दुष्काळ व पूरस्थिती निर्माण होण्याचे प्रमाण वाढत आहे.
अर्थव्यवस्थेसाठी चांगला पाऊस गरजेचा
देशात वर्षभर होणाऱ्या पावसापैकी ७० टक्के पाऊस हा मान्सूनच्या काळातच पडतो. देशातील ७० ते ८० टक्के शेतकरी शेतीसाठी मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे. मान्सून कमी झाल्यास शेती उत्पादन घटते. त्यामुळे महागाईत वाढ होते. देशाच्या अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचा हिस्सा २० टक्के आहे. देशाच्या अर्ध्या लोकसंख्येला त्यातून रोजगार मिळतो. चांगला पाऊस पडल्यास सणासुदीपूर्वी चांगले उत्पन्न मिळू शकते.