पुढील पाच दिवस सूर्य आग ओकणार; हवामान खात्याचा इशारा

दक्षिण राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरातचा अंतर्गत भाग आदी भागांमध्ये सरासरी तापमानापेक्षा १ ते ३ अंशाची वाढ अपेक्षित आहे. या सर्व भागात तापमान ३६ ते ४० अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
पुढील पाच दिवस सूर्य आग ओकणार; हवामान खात्याचा इशारा

नवी दिल्ली : देशातील चार राज्यांसह अनेक ठिकाणी येत्या पाच दिवसांत कडक उन्हाचा सामना करावा लागणार आहे, असा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू व केरळात मोठी तापमान वाढ होणार आहे, असेही खात्याने सांगितले. तसेच दक्षिण राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरातचा अंतर्गत भाग आदी भागांमध्ये सरासरी तापमानापेक्षा १ ते ३ अंशाची वाढ अपेक्षित आहे. या सर्व भागात तापमान ३६ ते ४० अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

तेलंगणात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तसेच मराठवाड्याचा काही भाग, ओदिशाचा अंतर्गत भाग, केरळ, दक्षिण कर्नाटकचा अंतर्गत भाग, तामिळनाडूची दक्षिण किनारपट्टी आदी भागात उन्हाचे तीव्र चटके बसतील. तसेच २७ ते २९ मार्चदरम्यान विदर्भ, दक्षिण मध्य प्रदेशात उन्हाच्या झळा जाणवतील. येत्या तीन दिवसांत वायव्य भारतात २ ते ३ अंश सेल्सिअसने तापमान वाढण्याची शक्यता आहे, तर येते पाच दिवस पूर्व व मध्य भारत, अंतर्गत महाराष्ट्र आदी भागात सरासरी तापमानापेक्षा २ ते ४ अंशांनी वाढ होणार आहे. तसेच तेलंगणा, रॉयलसीमा, तामिळनाडू, पुद्दुचेरी व कराईकल, केरळ व महेमध्ये २६ ते २९ दरम्यान तापमानात वाढ होईल.

काही राज्यांत पावसाची शक्यता

दरम्यान, गेल्या २४ तासांत अरुणाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, सिक्कीम येथील काही भागात तुरळक पाऊस पडला. आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा येथे पाऊस पडण्याची शक्यता आहे.

logo
marathi.freepressjournal.in