आयफोन दानपेटीत पडला अन् देवाचा झाला; तामिळनाडूतील मंदिरातील घटना

मंदिरात गेल्यानंतर भाविक देवाला पैसे, सोने-चांदी, अन्य दान करतात. चेन्नईच्या अरुलमिगु कंदास्वामी मंदिरात एका भाविकाच्या खिशातून चुकून त्याचा आयफोन देवाच्या दानपेटीत पडला.
आयफोन दानपेटीत पडला अन् देवाचा झाला; तामिळनाडूतील मंदिरातील घटना
Published on

चेन्नई : मंदिरात गेल्यानंतर भाविक देवाला पैसे, सोने-चांदी, अन्य दान करतात. चेन्नईच्या अरुलमिगु कंदास्वामी मंदिरात एका भाविकाच्या खिशातून चुकून त्याचा आयफोन देवाच्या दानपेटीत पडला. भाविकाने मंदिराच्या विश्वस्तांकडे फोन परत देण्यासाठी गयावया केली. मात्र, विश्वस्तांनी फोन दानपेटीत पडल्याने तो देवाचा झाला, असे सांगितले. भाविकाच्या हातात केवळ सिमकार्ड दिले. त्यामुळे संबंधित भाविक नाराज झाला.

तामिळनाडूच्या विनायकपुरम येथे राहणारा दिनेश हा भाविक अरुलमिगु कंदास्वामी मंदिरात देवाच्या दर्शनाला गेला होता. त्यावेळी पैसे दानपेटीत टाकत असताना त्याच्या खिशातून आयफोन दानपेटीत पडला. दानपेटीची उंची जास्त होती आणि त्यातून आयफोन काढणे शक्य नव्हते. त्याने याबाबतची माहिती मंदिर प्रशासन आणि विश्वस्तांना सांगितली. तेव्हा विश्वस्तांनी सांगितले की, दानपेटीत गेलेली प्रत्येक गोष्ट ही मंदिराची संपत्ती आहे. त्यामुळे फोन परत करता येणार नाही. तसेच मंदिरात प्रथेनुसार महिन्यातून दोनवेळा दानपेटी उघडली जाते. दुसऱ्यांदा जेव्हा दानपेटी उघडली गेली तेव्हा तरुण पुन्हा मंदिरात गेला. त्याने आयफोन परत देण्याची विनंती केली.

विश्वस्तांनी तरुणाला फोन देण्यास नकार देताना पुन्हा तेच सांगितलं की, दानपेटीत एकदा गोष्ट गेली की ती मंदिराची संपत्ती होते. मंदिर प्रशासनाच्या या भूमिकेनंतर तरुणाने हिंदू धार्मिक संस्था आणि धर्मादाय एन्डॉमेंट्स कायद्यानुसार तक्रार दाखल केली. त्यावेळी आयफोन नाही पण सिमकार्ड परत देऊ शकतो. यातून तुम्ही तुमचा डेटा परत मिळवू शकता, असे मंदिर प्रशासनाने सांगितले.

मंदिराचे कार्यकारी अधिकारी कुमारवेल यांनी सांगितले की, मंदिराची अशी परंपरा आहे की दानपेटीत असणारी कोणतीही वस्तू देवाची संपत्ती आहे. ती परत देता येत नाही. दिनेशने दान म्हणून आयफोन अर्पण केला असावा. त्याने नंतर निर्णय बदलल्याची शक्यता असावी. दानपेटीला लोखंडी कुंपण आहे, त्यामुळे तो सहजासहजी आत पडणे कठीण असल्याचेही मंदिर प्रशासनाकडून सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in