
गेल्या काही दिवसांपासून हिजाबचा मुद्दा चर्चेत असलेल्या उप्पिनगडी शासकीय महाविद्यालयात सोमवारी हिजाब घालण्याचा आग्रह धरणाऱ्या २४ विद्यार्थिनींना एका आठवड्यासाठी महाविद्यालयातून निलंबित करण्यात आले आहे. काही आठवड्यांपूर्वी या विद्यार्थिनींनी हिजाब विरोधाबद्दल प्रदर्शने केली होती. तसेच हिजाब न घालता महाविद्यालयात न येण्याच्या निर्णयावर ठाम होत्या. त्यांच्या या भूमिकेनंतर महाविद्यालयाने ही कारवाई केली आहे.
या घटनेनंतर मंगळुरू विद्यापीठाच्या सहसंचालकांनी सोमवारी महाविद्यालयाला भेट देत विद्यार्थिनींची समजूत काढली. त्यानंतरही विद्यार्थिनींनी हिजाब परिधान करून महाविद्यालयात प्रवेश करण्याचा हट्ट धरला. त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य शेखर यांनी सायंकाळी सर्व शिक्षकांची बैठक बोलावली. उच्च न्यायालयाचा निर्णय, शासनाचे परिपत्रक व महाविद्यालयाच्या समितीच्या निर्णयाची आठवण करून दिली. त्यानंतर २४ विद्यार्थिनींना एक आठवड्यासाठी महाविद्यालयातून निलंबित करण्यात आले. यापूर्वीही याच मुद्द्यावरून सात विद्यार्थिनींना निलंबित करण्यात आले आहे.
या वर्षी कर्नाटकात हिजाबचा वाद पेटला, तेव्हा हे प्रकरण कर्नाटक हायकोर्टात पोहोचले. “हिजाब हा इस्लामचा अनिवार्य धार्मिक भाग नाही. शालेय आग्रह धरणे घटनात्मकदृष्ट्या वैध आहे. त्यामुळेच विद्यार्थी शालेय गणवेश घालण्यास नकार देऊ शकत नाहीत,” असे हायकोर्टाने आपल्या निर्णयात म्हटले होते. प्रत्येकाने या नियमांचे पालन केले पाहिजे. या निर्णयाचे कर्नाटक सरकारनेही स्वागत केले आहे; मात्र असे असतानाही काही काळ विद्यार्थिनींकडून हिजाबबाबत आंदोलन करण्यात आले.