अवयवदात्यांचा शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार; राज्य सरकारचा निर्णय

आरोग्य विभागाच्या संचालकाने सांगितले की, ब्रेन डेड रुग्णाकडून अवयवदान मिळवणे कठीण असते.
अवयवदात्यांचा शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार; राज्य सरकारचा निर्णय

स्वप्नील मिश्रा/मुंबई : ‘मरावे परंतू किर्तीरूपी उरावे’, अशी मराठी म्हण आहे. मृत्यूनंतर आपल्या अवयवांचे दान करून अनेकांचे प्राण वाचवणाऱ्या अवयवदात्यांचा सन्मान करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. या अवयवदात्यांचा शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे राज्याच्या आरोग्य विभागाने ठरवले आहे.

१५० ब्रेन डेड झालेल्या व्यक्तींनी आपले अवयव दान करून अनेकांना जीवनदान केल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कळल्यावर त्यांनी याबाबत निर्णय घेतला. देशात अवयवदान करण्यात महाराष्ट्र हा चौथ्या क्रमांकावर आहे. तामिळनाडू, कर्नाटक प्रत्येकी १७५ जणांनी अवयवदान केले आहे.

आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, सध्या अवयवदानाबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे. कारण अवयवांची गरज असलेल्या रुग्णांची यादी वाढती आहे. एकाने अवयव दान केल्यास त्याचा फायदा दोन ते तीन रुग्णांना होत असतो.

आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, एका दशकात प्रथमच अवयवदानाने हजारांचा आकडा पार केल्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी या चळवळीतील अवयवदाते, डॉक्टर, परिचारिका, रुग्णालये, समुपदेशक आणि पोलिसांचे कुटुंबीयांचे अभिनंदन केले. गेल्यावर्षी १४९ ब्रेन डेड रुग्णांचे अवयवदान करण्यात आले.

राज्यात ६१०० जणांची प्रतीक्षा यादीत

महाराष्ट्रात ६१०० रुग्ण हे अवयवांच्या प्रतिक्षायादीवर आहेत. त्यात यकृत (१६०२), ह्रदय (११५), फुफ्फुस (४६), लहान आतडे (२१) व मोठे आतडे (२) हवे आहेत. कोविडनंतर २०२३ मध्ये अवयव दानाबाबत मोठी जनजागृती झाली. राज्यात विभागीय अवयव प्रत्यारोपण समिती आहे. ही अवयव दानाबाबत योग्य समन्वय साधते. या समितीचा आराखडा देशात सर्वोत्तम आहे, असे हा अधिकारी म्हणाला.

आरोग्य विभागाच्या संचालकाने सांगितले की, ब्रेन डेड रुग्णाकडून अवयवदान मिळवणे कठीण असते. कारण त्यांच्या कुटुंबाकडून परवानगी मिळवणे जिकीरीचे होते. लघुपट, मीडिया व अन्य माध्यमाद्वारे जनजागृती करणे गरजेचे आहे. मूत्रपिंड हे सर्वात मागणी असलेला अवयव आहे. मात्र, राज्यात सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. त्यातही अवयवदानासाठी दहा जण पुढे येतात मात्र ६ जण धार्मिक कारणास्तव त्याला नकार देतात, असे ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in