'इंडिया'चे नेतृत्व खर्गेंकडे; घटक पक्षांच्या ऑनलाईन बैठकीत निर्णय, कोणाचाही चेहरा प्रोजेक्ट करण्याची गरज नाही-शरद पवार

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
'इंडिया'चे नेतृत्व खर्गेंकडे; घटक पक्षांच्या ऑनलाईन बैठकीत निर्णय, कोणाचाही चेहरा प्रोजेक्ट करण्याची गरज नाही-शरद पवार

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावर चर्चा करण्यासाठी आघाडीच्या १४ घटक पक्षांच्या प्रमुखांची शनिवारी ऑनलाईन बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षपदासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार याचे नाव आघाडीवर होते, मात्र त्यांच्या नावाला विरोध झाल्याने खर्गे यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. दरम्यान, जागा वाटपाच्या या बैठकीला तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी उपस्थित नव्हत्या.

मुकुल वासनिक यांच्या घरी सुमारे दोन तास ही बैठक चालली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुंबईतून, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन आणि पक्षाच्या नेत्या कनिमोझी करुणानिधी चेन्नईमधून बैठकीत सहभागी झाले होते. २५ हून अधिक घटक पक्ष असलेल्या इंडिया आघाडीचे अध्यक्ष निवडीचे काम जिकिरीचे होते. मात्र, या आघाडीत सर्वात मोठा राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेसने नेतृत्व स्वीकारावे, असे नितीश कुमार यांनीच सुचवले. जागा वाटप हे आघाडीत मोठे आव्हानात्मक काम आहे. मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने घटक पक्षांना जागा वाटून देण्यास नकार दिला होता. प्रदेशाध्यक्ष कमलनाथ सहा जागांसाठी अडून बसले. त्यांनी केंद्रीय नेतृत्वाचेदेखील ऐकले नव्हते. त्यामुळे समाजवादी पक्ष नाराज झाला होता.

यावर अखिलेश यादव यांनी काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले होते. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर कमलनाथ यांची प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. जागा वाटपाबाबत काँग्रेसची आपसोबतची चर्चाही वादग्रस्त ठरत आहे. आपची दिल्ली आणि पंजाबमध्ये सत्ता असल्याने त्यांना येथे जास्त जागा हव्या आहेत. 'आप'ला गोवा, हरयाणा आणि गुजरातमध्येही निवडणूक लढवायची आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यावरूनही वाद आहेत.

कोणाचाही चेहरा प्रोजेक्ट करण्याची गरज नाही-

बैठकीनंतर पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी शरद पवार म्हणाले, ‘‘आम्हाला कोणाचाही चेहरा प्रोजेक्ट करावा, असे वाटत नाही. आम्हाला एखाद्याचा चेहरा प्रोजेक्ट करून, त्याच्या नावाने मते मागावीत, असे आत्ता तरी अजिबात वाटत नाही. कारण आम्हाला खात्री आहे की, आगामी लोकसभा निवडणूक झाल्यावर आणि आम्हाला बहुमत मिळाल्यावर आम्ही निश्चितच देशाला चांगला पर्याय देऊ. १९७७ च्या निवडणुकीत आम्ही पंतप्रधानपदाचा चेहरा आधीच घोषित केला नव्हता. निवडणुका झाल्या, त्या निवडणुकीत ज्या पक्षाची लोकांनी निवड केली, त्या पक्षाने मोरारजी देसाई यांची पंतप्रधानपदी नियुक्ती केली. तरीदेखील तेव्हा आम्ही निवडणूक जिंकलो. कारण तेव्हा लोकांमध्ये आणीबाणीविरोधात तीव्र भावना होत्या. त्या लक्षात घेऊन आम्ही मतं मागितली आणि लोकांनी मतं दिली. तशीच परिस्थिती आत्तादेखील आहे.’’

logo
marathi.freepressjournal.in