मणिपूर घटनेतील मुख्य आरोपीला अटक केली असून मृत्यू दंडाच्या शिक्षेवरही आम्ही विचार करु - मुख्यमंत्री एन बिरेन सिंह

पुढील आठवड्यात शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी होणार आहे
मणिपूर घटनेतील मुख्य आरोपीला अटक केली असून मृत्यू दंडाच्या शिक्षेवरही आम्ही विचार करु - मुख्यमंत्री एन बिरेन सिंह
Published on

मणिपूरमध्ये मागील अनेक महिन्यापासू हिंसाचार सुरु आहे. आता मणिपूरमधील एक संतापजनक व्हिडिओ समोर आला आहे. जमाव दोन महिलांना नग्न करुन त्यांची धिंड काढत आहे. यानंतर त्या महिलांवर सामूहिक अत्याचार करण्यात आला. या घटनेविरोधात देशभरातून संताप व्यक्त होतं आहे. मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांच्याबद्दल देखील देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. आता यावर बिरेन सिंह यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

या प्रकरणावर बोलताना बिरेन सिंह म्हणाले, हे अत्यंत अपमानास्पद आणि अमानवी कृत्य आहे. हा व्हिडिओ मे महिन्यातील असून तो आता समोर आला आहे. हा व्हिडिओ समोर येताच मणिपूर पोलिसांनी या प्रकरणाची स्व:ताहून दखल घेत आज सकाळीच मुख्य आरोपीला अटक केली आहे. पोलीस इतर आरोपींचा शोध घेत आहेत. असं बिरेन सिंह म्हणाले.

या प्रकरणावर पुढे बोलता ते म्हणाले की, सध्या या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी आम्ही प्रयत्न करु. मृत्यूदंडाच्या शिक्षेवर आम्ही विचार करु, कोणत्याही आरोपीला सोडले जाणार नाही. अशा घृणास्पद कृत्यांना समाजात अजिबात स्थान नाही. असं देखील बिरेन सिंह म्हणाले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील या प्रकराला लज्जास्पद म्हणत त्यावर शोक व्यक्त केला आहे. तसंच याप्रकरणी कोणालाही पाठीशी घातले जाणार नसल्याचं सांगत कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने सरकारला फटकारलं

मणिपूरमधील घटनेची सर्वोच्च न्यायालयाने स्व:ता दखल घेतली आहे. या घटनेवर नाराजी व्यक्त करत आरोपींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तसंच याप्रकरणी सरकारने तातडीने कारवाई न केल्यास आम्ही कारवाई करु, असं देखील सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी म्हटले आहे. या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर काय कारवाई झाली, हे सांगावं, असं म्हणत पुढील आठवड्यात शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in