कटाचा सूत्रधार दुसराच? आठ सुरक्षा कर्मचारी निलंबित

तरुणांच्या घुसखोरीनंतर संसदेच्या आत आणि बाहेर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे
कटाचा सूत्रधार दुसराच? आठ सुरक्षा कर्मचारी निलंबित
PM

नवी दिल्ली : संसदेत सहा तरुणांनी घुसखोरी करून संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याप्रकरणी संसद सचिवालयाने गुरुवारी ८ सुरक्षा कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासानुसार संसदेच्या सुरक्षा भंगाचा मुख्य सूत्रधार दुसराच कोणीतरी असल्याचा संशय आहे.

तरुणांच्या घुसखोरीनंतर संसदेच्या आत आणि बाहेर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. गुरुवारी संसदेत जाणाऱ्यांचे बूट, चपला काढून तपासणी करण्यात आली. दरम्यान, मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा यांना मकर गेटमधून इमारतीत प्रवेश देण्यात आला नाही. त्यानंतर संगमा कारमधून खाली उतरले आणि शार्दुल गेटमधून संसदेत गेले. दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेत पोहोचून केंद्रीय मंत्र्यांची बैठक घेतली. या बैठकीत गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि अनुराग ठाकूर उपस्थित होते.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी यापूर्वीही संसदेबाहेर रेकी केली होती. सर्व आरोपी भगत सिंग फॅन क्लब या सोशल मीडिया पेजशी संबंधित होते. सुमारे दीड वर्षांपूर्वी सर्व आरोपी म्हैसूरमध्ये भेटले होते. आरोपी सागर जुलैमध्ये लखनऊहून दिल्लीत आला होता, पण संसद भवनात प्रवेश करू शकला नाही. १० डिसेंबरला प्रत्येक जण आपापल्या राज्यातून दिल्लीला पोहोचले. घटनेच्या दिवशी सर्व आरोपी इंडिया गेटजवळ जमले. तेथे सर्वांना कलर स्प्रे वाटण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक तपासानुसार संसदेच्या सुरक्षा भंगाचा मुख्य सूत्रधार दुसराच कोणीतरी आहे.

सुरक्षा व्यवस्था कडेकोट

नव्या संसदेत घुसखोरी केल्यानंतर आता सुरक्षा प्रोटोकॉलमध्ये अनेक बदल केले जात आहेत.

१. खासदार, कर्मचारी आणि पत्रकारांसाठी स्वतंत्र प्रवेशद्वार

२. चौथ्या गेटमधून अभ्यागतांना प्रवेश. तुर्तास अभ्यागतांना पास नाहीत.

३. प्रेक्षक गॅलरीभोवती काचेचे तावदान

४. विमानतळांप्रमाणे प्रवेशद्वारावर बॉडी स्कॅन मशिन्स

५. सुरक्षा कर्मचाऱ्यांची संख्याही वाढवणार

असा रचला कट

संसदेत घुसखोरी करणारे सहाही तरुण सोशल मीडिया पेज भगत सिंग फॅन क्लबशी जोडले गेले होते. दीड वर्षांपूर्वी या सगळ्यांची भेट म्हैसूर येथे झाली होती. नऊ महिन्यांनंतर त्यांची भेट परत झाली. त्यावेळी त्यांनी संसदेत गदारोळ माजवण्याचा कट रचला. यावर्षी झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी मनोरंजन डी हा बंगळुरूतून आला होता. त्याने व्हिजिटर पास घेतला आणि संसदेची रेकी केली होती. जुलै महिन्यात सागर लखनऊहून दिल्लीला आला. मात्र, त्याला संसद भवनात जाता आले नव्हते. त्याने संसदेची बाहेरून रेकी केली होती.

रेकीच्या वेळी मनोरंजन डी ने संसदेत प्रवेश करताना बूट तपासले जात नसल्याची नोंद केली. १० डिसेंबरला हे सगळेजण एक-एक करून आपल्या राज्यांमधून दिल्लीला आले. मनोरंजन हा विमानाने दिल्लीला आला. सगळे आरोपी १० डिसेंबरच्या रात्री गुरुग्राम या ठिकाणी विकी आणि वृंदा यांच्या घरी पोहोचले होते. त्यावेळी उशिरा ललित झा हा तरुणही तिथे पोहचला होता. अमोल शिंदे हा महाराष्ट्रातून धूर असलेले फटाके घेऊन आला होता. सागर शर्मा याने १३ डिसेंबरच्या सकाळी ९ वाजता खासदार प्रताप सिन्हा यांच्या स्वीय सचिवाकडून पास मिळवला. सगळे आरोपी इंडिया गेट या ठिकाणी भेटले होते. त्याच ठिकाणी अमोलने सगळ्यांना धुराचे फटाके दिले.

सागर शर्मा आणि मनोरंजन १३ डिसेंबरच्या दुपारी १२ च्या आसपास संसदेच्या आत गेले. अमोल आणि नीलम हे दोघे संसदेच्या बाहेर थांबले आणि त्यांनी घोषणा सुरू केल्या. ललित झा हा त्यांचा व्हिडीओ बनवत होता. सिग्नल नावाच्या अॅपने हे सगळे एकमेकांशी जोडले गेले होते. हंगामा झाल्यानंतर ललित सगळ्यांचे मोबाइल घेऊन फरार झाला. या प्रकरणात विकी शर्मा आणि त्याची पत्नी वृंदा यांनाही गुरुग्राम पोलिसांनी अटक केली आहे. ललित झा हा तरुण फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in