नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने देशाच्या आरोग्य व्यवस्थेलाच रोगी बनवले असल्याची टीका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी रविवारी केली.
देशातील प्रतिष्ठित ऑल इंडिया इन्स्टिट्यूट्स ऑफ मेडिकल सायन्सेसच्या (एम्स) १९ रुग्णालयांत डॉक्टरांची संख्या आवश्यकतेपेक्षा कमी असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांतून आल्या होत्या. त्या अनुषंगाने खर्गे यांनी समाजमाध्यमांवर (एक्स किंवा ट्विटरवरून) हे विधान केले. भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यावर तीव्र आक्षेप घेण्यात आला असून केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी खर्गे यांच्या विधानाचे खंडन केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील प्रत्येक शब्दात केवळ असत्य पेरलेले असते. त्यांच्या लूट आणि शाब्दिक कोट्यांनी देशाला रोगी बनवले आहे. मोदी सरकार देशात अनेक नवीन एम्स रुग्णालये सुरू केल्याचा दावा करते. मात्र, अनेक एम्स रुग्णालयांत डॉक्टर आणि अन्य कर्मचाऱ्यांची वानवा असल्याचे सत्य आहे. कोरोना महासाथीतील अनास्थेपासून आयुष्मान भारत योजनेतील भ्रष्टाचारापर्यंतची प्रकरणे पाहता मोदी सरकारने देशाच्या आरोग्य व्यवस्थेलाच रोगी बनवून टाकले आहे. मात्र, ही फसवणूक आता लोकांच्या लक्षात आली असून मोदी सरकारला निरोप देण्याची वेळ आली आहे, असे खर्गे यांनी म्हटले आहे.
खर्गे यांच्या या टीकेचा समाचार घेताना मनसुख मांडवीय यांनी एक्सवरून (ट्विटरवरून) अनेक संदेश प्रसारीत केले. आमचे हेतू शुद्ध असल्याचे खर्गे यांनी लक्षात घ्यावे. काँग्रेस सरकारने ५० वर्षांच्या कार्यकाळात केवळ एक एम्स रुग्णालय सुरू केले. त्याउलट माजी पंतप्रधान अटलबिहारी वायपेयी यांच्या काळात सहा नवीन एम्स रुग्णालये सुरू झाली. तर मोदी सरकारच्या कार्यकाळात १५ नवीन एम्स रुग्णालये सुरू करण्यात आली. प्रत्येक नवीन रुग्णालयात आवश्यकतेनुसार डॉक्टर आणि अन्य कर्मचाऱ्यांची भरती केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून ५ लाख तरुणांना नोकरीची नियुक्तीपत्रे वाटली आहेत, असे मांडवीय यांनी स्पष्ट केले.