
गाड्यांचा शौक बहुतेक लोकांना असतो. सध्याच्या काळात एकाहून एक सरस गाड्या रस्त्यावर येत आहेत. आराम, वेग, सुरक्षितता आदींमुळे या गाड्यांच्या प्रेमात सर्वच जण पडतात. या गाड्यांच्या किमती कोट्यवधींच्या घरात असतात; पण दुर्मीळ कार खरेदी करण्याचा शौकही अनेकांना असतो. यासाठी अतिश्रीमंत ग्राहक शेकडो कोटी मोजायला तयार होतात. आता हेच बघाना जगातील सर्वात महागड्या गाडीचा लिलाव ११०० कोटी रुपयांना झाला आहे. ही गाडी आहे १९५५ मधील ‘मर्सिडीज बेंज ३०० एसएलआर’.
जगात लक्झरी व सुरक्षितेत पहिल्या क्रमांकावर मर्सिडीजमध्ये नाव येते. या कंपनीच्या एका कारचा नुकताच लिलाव झाला. यानंतर लिलावात विकली जाणारी ‘मर्सिडीज बेंज ३०० एसएलआर’ ही जगातील सर्वात महागडी कार ठरली आहे. ही कार ११०० कोटी रुपयांना विकली गेली आहे. ही कार १९५५ सालातील आहे.
ही कार रेसिंग असून तिचे लूक्स जबरदस्त आहेत. तिचे इंजिन ३.० लिटरचे असून तिचा जास्त वेग १८० किमी प्रति तास आहे. कंपनीने हा लिलाव गुप्त ठेवला होता. केवळ १० जणांनाच या लिलावात निमंत्रण होते. त्यातही जे लोक ऑटोमोबाइल क्षेत्राशी संबंधित होते. त्यांनाच बोलवले होते. ५ मे रोजी जर्मनीच्या स्टुटगार्ड येथील मर्सिडीज बेंझ म्युझियममध्ये लिलाव करण्यात आला. अशी माहिती कॅनडा येथील लिलाव कंपनी ‘आर सोथेबाय’हिने दिली.
यापूर्वी लिलावात कार विक्रीचा विक्रम ९५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स होता. तो विक्रम या लिलावाने मोडला आहे. या कारची विक्री १४३ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच ११०० कोटी रुपयांना करण्यात आली. कंपनीचे अध्यक्ष ओला कॅलेन्युएस यांनी सांगितले की, याल लिलावातून मर्सिडीज ब्रँडची ताकद सर्वांना कळली आहे. ही कार दुर्मीळ अशा ‘ॲरो’ शेपची आहे. या प्रकारच्या दोन कार कंपनीने बनवल्या होत्या. मात्र, त्यांची मालकी अजूनही कंपनीकडेच होती. ही कार बाळगणे अजूनही सन्मानाचे असेल. काही जणांनी या कारची विक्रीची किंमत कमी असल्याचे बोलून दाखवले, असे स्टीफन सेरियो या एजंटने सांगितले.