हैदराबाद : भारतातील देशांतर्गत हवाई प्रवाशांची संख्या २०३० पर्यंत वार्षिक ३० कोटींवर पोहोचू शकते. २०२३ मध्ये विमान प्रवाशांची संख्या १५.३ कोटी होती. तसेच देशातील विमानतळ आणि वॉटरड्रोमची संख्या सध्याच्या १४९ वरून २०० पेक्षा जास्त होईल, असे केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी गुरुवारी सांगितले.
नागरी विमान वाहतूक परिषद आणि प्रदर्शन, विंग्स इंडिया 2024 च्या उद्घाटन सत्रात बोलताना, सिंधिया म्हणाले की, २०३० मध्ये वर्षाला ३० कोटी प्रवाशांसह भारताचा विमान वाहतूक हिस्सा १० ते १५ टक्के झालेला असेल आणि त्यानंतरही बाजारपेठ आशादी राहील. गेल्या दशकात देशांतर्गत हवाई प्रवाशांमध्ये १५ टक्के वाढ झाली आहे, तर आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक ६.१ टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या १५ वर्षांत, देशांतर्गत मालवाहतूक ६० टक्के, आंतरराष्ट्रीय ५३ टक्के वाढ झाली आहे. यावेळी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंग आणि तेलंगणाचे मंत्री के. व्यंकट रेड्डी यांचीही भाषणे झाली.
विंग्ज इंडिया २०२४ मध्ये नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनीही सांगितले की, भारत अमेरिका आणि चीननंतर विमानांचा सर्वात मोठा जागतिक खरेदीदार म्हणून उदयास आला आहे. भारतीय कंपन्यांनी बोईंग आणि एअरबसला दिलेल्या विमानांच्या ऑर्डरबद्दल सांगितले. इंडिगोने ५०० विमानांची ऑर्डर दिली आहे, तर एअर इंडियानेही ४७० विमानांची ऑर्डर दिली आहे. अलीकडेच लॉन्च झालेल्या अकासा एअरने २०० हून अधिक विमानांची ऑर्डर दिली आहे.
२० वर्षांत २,८४० नवीन विमानांची गरज
भारताला पुढील २० वर्षांत २,८४० नवीन विमाने आणि ४१ हजार वैमानिक तसेच ४७ हजार तांत्रिक कर्मचाऱ्यांची आवश्यकता असेल, रेमी मेलार्ड, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एअरबस इंडिया आणि दक्षिण आशियाने गुरुवारी सांगितले.
एव्हिएशन कॉन्क्लेव्ह आणि प्रदर्शन, विंग्स इंडिया २०२४ च्या बाजूला पत्रकार परिषदेत मेलर्ड म्हणाले की, एअरबस सध्याच्या ७५० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सवरून दशकाच्या अखेरीस भारतातील व्यवसाय दुप्पट १.५ अब्ज डॉलर्सची होईल. गेल्या वर्षी एअरबसला ७५० विमानांची ऑर्डर मिळाली आणि त्यांनी भारतीय विमान कंपन्यांना ७५ युनिट्स वितरित केले. त्यात इंडिगोला ४१, एअर इंडियाला १९, विस्ताराला १४ आणि गो फर्स्टला एकचा समावेश आहे. भारत ही एक अशी शक्ती आहे जी पुढील दशकांमध्ये जागतिक विमान वाहतुकीला सामर्थ्यवान बनवेल, असे ते म्हणाले. तसेच भारताला पुढील २० वर्षांमध्ये २,८४० नवीन विमानांची गरज भासणार आहे, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. तर वाढत्या विमान वाहतूक बाजाराच्या गरजा पूर्ण होतील, असेही ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की A350 विमाने भारतातील आंतरराष्ट्रीय प्रवासातील महत्त्वाचा घटक आहेत आणि यापैकी सहा विमाने मागील वर्षी एअर इंडियाला देण्यात आली आहेत.
अकासा एअरची १५० बोईंग 737 मॅक्स विमान खरेदीची ऑर्डर
भारताची नवीन एअरलाईन अकासा एअरने बोईंग 737 मॅक्स विमानांची ऑर्डर दिली आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात नवीन उड्डाणे सुरू करण्यासाठी ते या विमानांचा वापर करेल. कंपनीने यापूर्वी ७६ बोईंग ७३७ मॅक्स विमानांची ऑर्डर दिली होती. हैदराबादमध्ये आयोजित विंग्स इंडिया स्पर्धेदरम्यान हा करार करण्यात आला आहे. दिवंगत राकेश झुनझुनवाला यांच्या कुटुंबाची अकासा एअरमध्ये मोठी गुंतवणूक आहे. ऑर्डरपैकी २२ विमाने देण्यात आली आहेत. २०२२ मध्ये उड्डाण सुरू केल्यापासून अकासाने चार टक्के बाजार हिस्सा मिळवला आहे, तर इंडिगोकडे ६० टक्के तर टाटा समूहाच्या एअरलाईन्सचा एकत्रित हिस्सा २६ टक्के आहे.