कोट्याधीशांची संख्या दोन वर्षांत दुप्पट

भारतात १.६९ लाख वैयक्तिक करदात्यांचे उत्पन्न १ कोटी आहे
कोट्याधीशांची संख्या दोन वर्षांत दुप्पट
Published on

नवी दिल्ली : भारतात १ कोटी रुपये उत्पन्न घेणाऱ्या प्राप्तिकरदात्यांची संख्या गेल्या दोन वर्षांत दुप्पट झाली आहे, अशी माहिती प्राप्तिकर विभागाने दिली आहे. भारतात १.६९ लाख वैयक्तिक करदात्यांचे उत्पन्न १ कोटी आहे.

२०२१-२२ मध्ये एक कोटी रुपये उत्पन्न असणाऱ्यांची संख्या १,१४,४४६ होती. २०२०-२१ मध्ये एक कोटी रुपये उत्पन्न असणाऱ्यांची संख्या ८१,६५३ होती.

२०२२-२३ मध्ये २.६९ लाख कंपन्या, व्यक्ती, ट्रस्ट, फर्म यांनी आपले उत्पन्न १ कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचे दाखवले आहे. त्यात ६६३९७ कंपन्या, २५२६२ फर्म, ३०५९ ट्रस्ट, २०६८ असोसिएशन ऑफ पर्सन यांचा समावेश आहे.

२०२२-२३ मध्ये ७.७८ कोटी आयटीआर दाखल झाले. २०२१-२२ मध्ये ७.१४ कोटी, २०२०-२१ मध्ये ७.३९ कोटी आयटीआर दाखल झाले होते.

आयटीआर भरण्यात महाराष्ट्र अव्वल

२०२२-२३ मध्ये आयटीआर भरण्यात महाराष्ट्र अव्वल आहे. त्यानंतर उत्तर प्रदेशात ७५.७२ लाख, गुजरात ७५.६२ लाख, राजस्थान ५०.८८ लाख जणांनी आयटीआर भरले, तर प. बंगालमध्ये ४७.९३ लाख, तामिळनाडू ४७.९१ लाख, कर्नाटक ४२.८२ लाख, आंध्र प्रदेश ४०.०९ लाख, तर दिल्लीत ३९.९९ लाख जणांनी आयटीआर भरले.

logo
marathi.freepressjournal.in