नव्या व्हेरिएंटची रुग्णसंख्या हजार पार

राज्यांमधील इन्फ्लुएंझा रुग्णांवर बारकाईने लक्ष ठेवावे, अशी आणखी एक सूचना देखील करण्यात आली आहे.
नव्या व्हेरिएंटची रुग्णसंख्या हजार पार
Published on

नवी दिल्ली : कोविड-१९ साथीच्या विषाणूचा नवा अवतार जेएन-१ आता देशभरात पसरू लागला आहे. शुक्रवारी या विषाणूने उत्तर प्रदेशात प्रवेश केला. यामुळे या विषाणूची लागण झालेल्या देशातील एकूण राज्यांची संख्या आता १६ झाली आहे. तर रुग्णसंख्या १०१३ झाली आहे. केंद्रशासित प्रदेशातही या विषाणूने आपले हातपाय पसरले आहेत.

भारतात सार्सविषयी माहिती जमवणाऱ्या इंडियन सार्स-सीओव्ही-२ जिनॉमिक्स कंसॉर्टिअम उर्फ इन्साकॉग संस्थेने ही माहिती दिली आहे. या संस्थेच्या माहितीनुसार आजमितीस कर्नाटक राज्यात सर्वाधिक २१४ कोविड -१९ जेएन-१ रुग्ण आहेत. त्या पाठोपाठ महाराष्ट्रात १७० तर केरळात १५४ आणि आंध्र प्रदेशात १८९ रुग्ण आहेत. तसेच गुजरात आणि गोवा राज्यात अनुक्रमे ७६ व ६६ रुग्णांची नोंद झाली आहे.

तेलंगणा आणि राजस्थान या राज्यांमध्ये प्रत्येकी ३१ जेएन-१ रुग्णांची नोंद झाली आहे. त्याखालोखाल छत्तिसगड २५, तामिळनाडू १, २२, दिल्ली १६, उत्तर प्रदेश ६, हरयाणा ५, ओदिशा ३, पश्चिम बंगाल २, उत्तराखंड १ अशी रुग्णांची नोंद झाली आहे. १६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात मिळून देशभरात एकूण १०१३ जेएन-१ रुग्णांची नोंद झाली आहे. केंद्र सरकारने राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना कोविड रुग्णांवर बारकार्इने लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. तसेच राज्यांनी कोविड बाबतच्या मार्गदर्शक तत्वांचे कटाक्षाने अनुपालन होत आहे की नाही, याची खात्री करुन घ्यावी, अशी सूचना देखील केंद्राने केली आहे.

राज्यांमधील इन्फ्लुएंझा रुग्णांवर बारकाईने लक्ष ठेवावे, अशी आणखी एक सूचना देखील करण्यात आली आहे. दुसरीकडे जागतिक आरोग्य संघटनेने जेएन-१ हा स्वतंत्र व्हेरिएंट असून त्यावर बारकार्इने लक्ष ठेवण्याची गरज आहे, असे जाहीर केले आहे. यामुळे जगात सार्वजनिक आरोग्य धोक्यात येऊ शकते, असा इशारा देखील जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.

logo
marathi.freepressjournal.in