अंबानी कुटुंबियांना धमकी देणाऱ्याला बिहारमधून अटक

धमकी देण्यामागील कारणाचा तपास सुरू असून पोलिसांनी त्याच्याकडून मोबाईल जप्त केला आहे. हा मोबाईल फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात येणार आहे
अंबानी कुटुंबियांना धमकी देणाऱ्याला बिहारमधून अटक
Published on

दक्षिण मुंबईतील रिलायन्स फाऊंनडेशन रुग्णालय उडवण्याची तसेच अंबानी कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका बिहारी तरुणाला डी. बी मार्ग पोलिसांनी अटक केली. राकेशकुमार मिश्रा असे या तरुणाचे नाव असून त्याला बिहारच्या दरभंगा येथून स्थानिक पोलिसांनी बिहार पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले आहे. त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त निलोत्पल यांनी सांगितले.

धमकी देण्यामागील कारणाचा तपास सुरू असून पोलिसांनी त्याच्याकडून मोबाईल जप्त केला आहे. हा मोबाईल फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात येणार आहे. बुधवारी दुपारी एक वाजता रिलायन्स फाऊंनडेशन रुग्णालयाच्या लॅण्डलाईन क्रमांकावर दोन कॉल आले होते. यातील पहिल्या कॉलमध्ये अज्ञात व्यक्तीने संपूर्ण रुग्णालय बॉम्बस्फोटाने उडवून देण्याची तर दुसऱ्या कॉलमध्ये मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. या घटनेची पोलीस उपायुक्त निलोत्पल यांनी गंभीर दखल घेत डी. बी. मार्ग पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली होती. आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी तीन विशेष पथकाची नियुक्ती केली होती. त्यापैकी एक टीम बिहारला गेली होती. या पथकाने बिहार पोलिसांच्या मदतीने दरभंगा परिसरातून राकेशकुमार मिश्रा याला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच धमकीचा कॉल केल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर त्याला अटक करून पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले. त्याला लोकल कोर्टात हजर केले जाणार असून पोलीस कोठडीची मागणी करून चौकशी केली जाणार आहे. धमकी देण्यामागे त्याचा काय उद्देश होता, त्याला धमकी देण्यास कोणी प्रवृत्त केले होते, त्याने यापूर्वीही अशाप्रकारे धमकीचे कॉल केले आहेत का, याचा आता पोलीस तपास करणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in