नव्या संसदेकडे कुच करणाऱ्या पैलवानांना पोलिसांनी घेतले ताब्यात

पोलीस आणि पैलवान यांच्या शाब्दिक चकमक झाल्यानंतर पोलिसांकडून आंदोलक पैलवानांना ताब्यात घेण्यात आले
नव्या संसदेकडे कुच करणाऱ्या पैलवानांना पोलिसांनी घेतले ताब्यात

दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर सुरु असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनात गोंधळ सुरु झाला आहे. यानंतर पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. पैलवान आज जंतर-मंतर मैदानावरुन नव्या संसदेसमोर महापंचायत भरवायला निघालेले असताना पोलिसांकडून त्यांना रस्त्यात अडवण्यात आले. त्यानंतर पोलीस आणि पैलवान यांच्या शाब्दिक चकमक झाली. यानंतर पोलिसांकडून आंदोलक पैलवानांना ताब्यात घेण्यात आले.

गेल्या काही दिवसांपासून कुस्तीपटू दिल्लीत आंदोलन करत आहेत. त्यांनी आज महापंचायत भरवायला नव्या संसद भवनाकडे कुच केली. यावेळी पोलिसांकडून पैलवानांना अडवण्यात आले. त्यानंतरही पैलवानांनी पोलिसांचे पॅरिकेड ओलांडून पुढे जाण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांकडून पैलवानांना ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांकडून आंदोलक पैलावानांना रोखण्यात आल्यानंतर ते केरळ हाऊस जेथून नवीन संसद भवन हाकेच्या अंतरावर आहे, त्याठिकाणी ठिय्या मांडून बसले. कुस्तीपटू आज नव्या संसदेला घेराव घालण्याच्या तयारील आहेत. कुस्तीपटू साक्षी मलिकने माध्यामांना याबाबतची माहिती दिली होती.

कुस्तीपटू भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्या अटकेच्या मागणीवर ठाम आहेत. कुस्ती महासंघात आर्थिक गैरव्यवहार केल्याचे तसेच लैगिंक शोषणाचे गंभीर आरोप पैलवानांकडून बृजभूषण यांच्यावर करण्यात आले आहेत. यासाठी कुस्तीपटूंचे सुमारे महिनाभरापासून दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर आंदोलन सुरु आहे. यासाठी कुस्तीपटू वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करताना दिसत आहेत. त्यांनी 23 मे रोजी दिल्लीतील इंडिया गेटवर कँडल मार्च काढला होता. तर आज (28 मे) रोजी महापंचायतीचे आयोजन करुन नव्या संसदेला घेराव घालण्याची तयारी पैलवान करत आहेत. या आंदोलनात सामील होण्याचे आवाहन कुस्तीपटूंनी केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in