नवी दिल्ली: भाजपाला कोणत्याही परिस्थितीत सत्तेपासून दूर ठेवण्याचा निर्धार करुन स्थापन झालेल्या इंडिया आघाडीत निवडणुकीच्या निकालाआधीच बिघाडीची बीजे रुजायला लागली आहेत. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांचे भावी पंतप्रधान असा उल्लेख असलेले विशाल होर्डिंग लावण्यात आले आहे. यामुळे इंडिया आघाडीतील अन्य नेत्यांच्या मनामध्ये चलबिचल निर्माण झाली आहे तर भाजप पक्षाच्या हातात टिका करण्यासाठी आयते कोलीत मिळाले आहे.
एवढे मोठे होर्डिंग अखिलेश यादव यांच्या परवानगीशिवाय नक्कीच लागणार नाही. ही परवानगी कदाचित गुप्त असेल. मात्र यामुळे कॉंग्रेस पक्षावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न नाकारता येणार नाही. समाजवादी पक्ष मध्य प्रदेशमध्ये काही विधानसभा जागांची मागणी करीत असून ती मिळवण्यासाठी हे दबावतंत्र असू शकते असा अंदाज बांधण्यात येत आहे. शनिवारी अखिलेश यादव आणि राज्यातील कॉंग्रेस नेते यांच्यात तणाव निर्माण करणारे संभाषण झाले होते. कॉंग्रेसला आमच्यासाठी जागा सोडायच्या नसतील तर बोलणी व्यर्थ्य आहेत असे अखिलेश यादव यांनी स्पष्ट सांगितले होते. दरम्यान सत्ताधारी भाजपने अखिलेश यादव यांच्या पोस्टरबाजीवर भाष्य करतांना हे मुंगेरीलालची स्वप्ने आहेत असा उल्लेख केला आहे. तसेच भाजपचे केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांनी अखिलेश यादव, नितीश कुमार यांना कॉंग्रेस अजून समजायची आहे असा टोमणा मारला आहे.