नवी दिल्ली : भारताच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या जी-२० संघटनेच्या दोन दिवसीय शिखर परिषदेचा रविवारी समारोप झाला. पुढील वर्षात संघटनेचे फिरते अध्यक्षपद ब्राझीलकडे आहे. त्यामुळे समारोपाच्या कार्यक्रमात मोदी यांनी ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांच्याकडे प्रतीकात्मकरीत्या अध्यक्षपद प्रदान केले. मोदी यांनी अध्यक्षपदाचा हातोडा (गावेल) लुला यांच्याकडे सुपूर्द केला.
गतवर्षी संघटनेचे अध्यक्षपद इंडोनेशियाकडे होते. नोव्हेंबर २०२२ मध्ये बाली येथे शिखर परिषद पार पडली होती. त्यावेळी इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विदोदो यांनी मोदी यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा दिली होती. भारताच्या अध्यक्षपदाची मुदत १ डिसेंबरपासून सुरू झाली होती. संघटनेच्या फिरत्या अध्यक्षपदाची भारताची मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत आहे.
लुला यांनी मोदींकडून अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर मोदी यांच्या कामगिरीचे कौतुक केले. मोदी यांनी जगाच्या दक्षिण गोलार्धातील विकसनशील देशांच्या प्रश्नांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडण्यात आघाडी घेतल्याबद्दल लुला यांनी मोदींचे आभार मानले. तसेच संयुक्त राष्ट्रांची सुरक्षा परिषद, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक आदी संस्थांच्या विस्ताराबाबत मोदी यांनी व्यक्त केलेल्या अपेक्षेला पाठिंबा जाहीर केला.