पंतप्रधानांना हॅट‌्ट्रिकची गॅरंटी! तिसरी टर्म पूर्ण करणार : सोलापुरात असंघटित कामगारांच्या घरांचे लोकार्पण

काँग्रेसच्या गॅरंटी योजनेवर निशाणा साधताना मोदी म्हणाले, ‘‘यापूर्वी गरिबी हटावचे केवळ नारे दिले जायचे.
पंतप्रधानांना हॅट‌्ट्रिकची गॅरंटी! तिसरी टर्म पूर्ण करणार : सोलापुरात असंघटित कामगारांच्या घरांचे लोकार्पण

सूर्यकांत आसबे/सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत देशात पुन्हा भाजपचेच सरकार येईल, असा विश्वास व्यक्त करत पंतप्रधान म्हणून आपण तिसरी टर्म पूर्ण करणार असल्याची गॅरंटी शुक्रवारी लाखोंच्या साक्षीने दिली. तसेच भारत देश जगातील टॉप तीनच्या अर्थव्यवस्थांमध्ये सहभागी होईल, असा आत्मविश्वासही व्यक्त केला.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील रे नगर येथे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्या संकल्पनेतून देशातील सर्वात मोठ्या १५ हजार घरांच्या असंघटित कामगार वसाहतीचे लोकार्पण आणि पाच लाभार्थींना चावी प्रदान करण्याचा कार्यक्रम शुक्रवारी दुपारी पार पडला. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते रिमोट कंट्रोलद्वारे गृहप्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. तसेच सुनीता जगले, लता दासरी, रिजवाना मकानदार, बाळूबाई वाघमोडे आणि लता आडम या पाच लाभार्थींना पंतप्रधानांनी घरांची चावी प्रदान केली. तसेच काही लाभार्थींना कर्जाचे धनादेश दिले.

पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘‘आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे अनेकांना हक्काचे घर घेता येत नाही, अशा गरजूंसाठी भाजप सरकारने देशभरात सुमारे चार कोटी घरांचे वाटप केले आहे आणि पुढील पाच वर्षे हे काम असेच सुरू राहणार आहे. माझे सरकार गरीबांसाठी समर्पित आहे. गरीबांचे स्वप्न पूर्ण करणे हाच माझा संकल्प आहे. दहा वर्षांपूर्वी देशात सर्वत्र फक्त झोपड्या दिसत होत्या. मात्र, आता आम्ही पक्की घरे देत आहोत. शहरात आज कॉलनी उभ्या केल्या जात आहेत. कामगारांना भाड्याने घरे उपलब्ध करून दिली जात आहेत. आज एक लाखाहून अधिक कुटुंबांचा गृहप्रवेश होत आहे. या गरीब लोकांचे आशीर्वाद ही माझी सर्वात मोठी ठेव आहे.’’

काँग्रेसच्या गॅरंटी योजनेवर निशाणा साधताना मोदी म्हणाले, ‘‘यापूर्वी गरिबी हटावचे केवळ नारे दिले जायचे. मात्र, गरिबी कधी हटली नाही. अर्धी भाकर खायची आणि घोषणा द्यायचा, ही वेळ आता मोदी सरकारच्या काळात येणार नाही. मोदीची गॅरंटी म्हणजे गॅरंटी. वचन पूर्ण होण्याची गॅरंटी. केंद्र सरकारच्या माध्यमातून आरोग्य, रोजगार, निवारा, मूलभूत सोयीसुविधांच्या योजना राबवून सरकारने पूर्ण केलेली ही गॅरंटी आहे. भाजपची नियत साफ आणि देशाप्रति निष्ठा आहे. त्यामुळे भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी आमच्या सरकारने दिलेली गॅरंटी आम्ही पूर्ण करणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ हजार घरांचे लोकार्पण केल्यानंतर असंघटित कामगारांशी संवाद साधताना त्यांनी लहानपणी आपल्याला असे घर मिळाले असते तर..,’ असे म्हणत ते काही वेळ भाषण थांबवून भावुक झाले. त्यानंतर काही वेळाने त्यांनी तडाखेबाज भाषण ठोकले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात सोलापुरी चादर आणि गारमेंट उद्योगाचा गौरवपूर्ण असा उल्लेख केला. आपल्या अंगातील जॅकेटकडे हात करून त्यांनी ये जो मैने जॅकेट पहना है, वह जॅकेट सोलापूर में काही मेरा चाहता भेजता है. मैने उसे मना करने पर भी उसने मुझे जॅकेट भेजा है. मैने फोन कर उसे डाटा भी, फिर भी मुझे ओ जॅकेट भेजता है, आज भी वो मुझे देने के लिए जॅकेट लेके आया है, असे पंतप्रधान मोदींनी सांगताच समोर बसलेले टेलर बालाजी यज्जा यांनी हात उंचावले आणि एकच टाळ्यांचा कडकडाट झाला.

मुख्यमंत्र्यांकडून कौतुक अन‌् मोदींची शाबासकी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच आज गरीब आणि गरजूंना घरे मिळत असल्याचे सांगत दावोस येथे झालेल्या वेगवेगळ्या करारात तीन लाख ५३ हजार कोटींचे करार करण्यात आले असल्याचे सांगितले. ते भाषणात पंतप्रधान मोदींची गॅरंटीचा उल्लेख सातत्याने करत होते. रे नगरच्या घरांचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते झाले आणि त्यानंतर त्याचे लोकार्पणही त्यांच्याच हस्ते केले जात आहे, यालाच मोदींची गॅरंटी म्हणतात, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. मुख्यमंत्री भाषण संपवून आपल्या जागेवर बसताच पंतप्रधानांनी त्यांची पाठ थोपटली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in