5G स्पेक्ट्रम लिलाव प्रक्रिया सोमवारी संपल्यानंतर एका दिवसात सरकारने स्पेक्ट्रम ‘हार्मोनायझेशन’ची प्रक्रिया पूर्ण करत स्पेक्ट्रमच्या वितरणाचा मार्ग मोकळा केला आहे. 5G स्पेक्ट्रम वितरणाची प्रक्रिया १२ ऑगस्टपूर्वी म्हणजे अवघ्या एक आठवड्यात पूर्ण केली जाईल, असे दूरसंचारमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.
वैष्णव म्हणाले की, लिलाव प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यास संमती देणाऱ्या सचिवांच्या समितीने मंजुरी देण्याचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला आहे.
एरिक्सन, नोकिया, सॅमसंगसोबत करार
ऑगस्ट महिन्याला सुरूवात झालेली असून याच महिन्यात स्वातंत्र्यदिनापर्यंत अर्थात १५ ऑगस्टपर्यंत देशभरात 5G सेवा सुरू होणार आहे. एअरटेल टेलिकॉम कंपनी ही 5G सेवा सुरू करणारी देशातील दुसरी कंपनी ठरणार आहे. त्यासाठी कंपनीने एरिक्सन, नोकिया आणि सॅमसंगसोबत करार केलेले आहेत. दुसरीकडे जिओने देखील १५ ऑगस्टला देशभरात 5G नेटवर्क सेवा सुरू करण्याचे संकेत दिले आहेत.
अर्थातच 5G सेवा कार्यान्वित झाल्यानंतर इंटरनेटचा वेग वाढणार आहे. एअरटेलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गोपाल विट्टल यांनी सांगितले की, देशातील ग्राहकांना 5G कनेक्टिव्हिटीचा पूर्ण लाभ देण्यासाठी कंपनी जगभरातील सर्वोत्तम तंत्रज्ञान भागीदारांसमवेत काम करणार आहे.
दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काही दिवसांपूर्वीच सांगितले की, 5G सेवांचे दर कंपनी ठरवतील. त्यामुळे 5G सेवांचे दर 4G च्या बरोबरीने आणण्यासाठी 5G सेवा सुरुवातीला १० ते १५टक्क्याच्या प्रीमियमवर ऑफर केल्या जातील, अशी उद्योगतज्ज्ञांची अपेक्षा आहे.
भारतात 5G इंटरनेट सेवा सुरू झाल्यानंतर इंटरनेटचा वेग वाढल्याने लोकांची कामे तर सोपे होतील. पण मनोरंजन आणि दळणवळण क्षेत्रातही खूप बदल होतील. एरिक्सन 5G साठी काम करणाऱ्या कंपन्यांना विश्वास आहे की, ५ वर्षांत भारतात ५०० दशलक्ष 5G इंटरनेट वापरकर्ते असतील.