
प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात आज (बुधवारी) पहाटे घडलेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेबाबत महत्त्वाची अपडेट येत आहे. या दुर्घटनेत 30 भाविकांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 25 जणांची ओळख पटली आहे. तर 36 जणांवर स्थानिक वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. महाकुंभचे DIG वैभव कृष्णा यांनी पत्रकार परिषदेत ही माहित दिली. तसेच कोणत्या कारणामुळे ही दुर्घटना घडली, ते देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
महाकुंभमेळ्यात आज पहाटे चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली. यामध्ये अनेक भाविक पायदळी तुडवले गेले. अनेकांना गर्दीने फरफटत नेले. परिणामी एकच गोंधळ उडाला. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस प्रशासनाने तातडीने कार्यवाही करत मदत कार्याला सुरुवात केली. या दुर्घटनेतील मृतांची आणि जखमींची आकडेवारी DIG कृष्णा यांनी दिली आहे.
कृष्णा यांच्या माहितीनुसार, मदत कार्य सुरु केल्यानंतर 90 लोकांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले. परंतु दुर्दैवाने यामध्ये 30 भाविकांचा मृत्यू झाला आहे. या 30 पैकी 25 जणांची ओळख पटली आहे आणि उर्वरित लोकांची ओळख पटलेली नाही. यामध्ये कर्नाटकातील 4, आसाममधील 1, गुजरातमधील 1 जणांचा समावेश आहे... 36 जणांवर स्थानिक वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. सध्या परिस्थिती सामान्य आहे.
दुर्घटनेचे नेमके कारण काय?
चेंगराचेंगरीची दुर्घटना का घडली याविषयी माहिती देताना DIG कृष्णा म्हणाले "ब्रह्म मुहूर्ताच्या आधी, पहाटे 1 ते 2 च्या दरम्यान, आखाडा मार्गावर मोठी गर्दी जमली होती. या गर्दीमुळे, दुसऱ्या बाजूचे बॅरिकेड्स तुटले. बॅरिकेड्स तुटल्यानंतर तेथील गर्दी दुसऱ्या बाजूला असलेल्या ब्रह्म मुहूर्ताच्या पवित्र स्नानासाठी वाट पाहणाऱ्या भाविकांवर धावली. परिणामी गोंधळ होऊन लोक एकमेकांच्या अंगावर धावले. यामध्ये चेंगराचेंगरी झाली.
दरम्यान, भाविकांची सोय लक्षात घेऊन, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सर्व महामंडलेश्वर, संत, आखाड्यांना काही विलंबाने पवित्र स्नान करण्याची विनंती केली आहे. त्यानुसार आखाड्यांचे अमृत स्नान काही काळ थांबून नंतर सुरू करण्यात आले. हे स्नान सुरक्षितपणे संपन्न झाले आहे, असे कृष्णा यांनी सांगितले.