महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी सप्टेंबरमध्ये रिझर्व्ह बँक रेपोरेट वाढवण्याची शक्यता

केंद्रीय बँकांप्रमाणेच भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात आरबीआयही महागाई नियंत्रित करण्यासाठी आक्रमक दृष्टिकोन घेऊ शकते
महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी सप्टेंबरमध्ये रिझर्व्ह बँक रेपोरेट वाढवण्याची शक्यता

घाऊक महागाई आणि किरकोळ महागाईने किंचित दिलासा दिला आहे. जुलैमध्ये घाऊक महागाई दर १३.९३ टक्क्यांवर घसरला. महागाई पाच महिन्यांतील नीचांकी पातळीवर आहे. किरकोळ महागाईदर गेल्या तीन महिन्यांपासून कमी होत असला तरी पुढील वर्षी मार्चपर्यंत तो ६ टक्क्यांच्या खाली येण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे आणखी काही महिने वाढत्या महागाईच्या झळा कायम राहणार असल्याने वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी सप्टेंबर महिन्यात रिझर्व्ह बँक रेपोरेट वाढवण्याची दाट शक्यता असल्याचा अंदाज जर्मनीच्या डॉएच बँकेने आणि बार्कलेजने वर्तवला आहे.

बार्कलेजचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ (भारत) राहुल बाजोरिया म्हणाले की, अन्य देशातील केंद्रीय बँकांप्रमाणेच भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात आरबीआयही महागाई नियंत्रित करण्यासाठी आक्रमक दृष्टिकोन घेऊ शकते. आरबीआय डिसेंबरपर्यंत रेपोदरात ०.६० टक्क्यापर्यंत वाढ करू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

तसेच सप्टेंबर आणि डिसेंबरमध्ये चलनविषयक धोरण समिती (एमपीसी) च्या बैठकीत, आरबीआय रेपो दरात दोनदा ०.५० टक्क्यांनी वाढ करू शकते. त्याचवेळी, सप्टेंबरमध्ये होणाऱ्या एमपीसीच्या बैठकीत पॉलिसी रेट ०.५० टक्क्यानी वाढवू शकते, असे काही विश्लेषकांचे मत आहे.

महागाई रोखण्यासाठी रिझर्व्ह बँक (आरबीआय) पुन्हा रेपोदरात वाढ करण्याच्या विचारात आहेत. एकीकडे महागाई दर काही प्रमाणात घसरू शकतो. मात्र, कर्जावरील हप्ता मात्र कमी होणार नाही. उलट ईएमआय वाढणार असल्याने कर्जदारांना अधिक खर्च करावा लागेल. रिझर्व्ह बँकेच्या आगामी पतधोरण आढावा बैठकीपूर्वीच, मध्यवर्ती बँकेने महागाई नियंत्रणासाठी पुढाकार घेतला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in