
नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून सभागृहांमधील कामकाज सुरळीत सुरू राहण्यात निर्माण झालेला तिढा अखेर सोमवारी सुटला. लोकसभा आणि राज्यसभेत राज्यघटनेवर चर्चा करण्याबाबत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये मतैक्य झाले आणि कोणत्या दिवशी चर्चा होणार तेही निश्चित करण्यात आले. त्यामुळे मंगळवारपासून संसदेचे कामकाज सुरळीतपणे पार पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
लोकसभेत राज्यघटनेवर १३ आणि १४ डिसेंबर रोजी, तर राज्यसभेत १६ आणि १७ डिसेंबर रोजी चर्चा होणार आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी या तारखांची सोमवारी घोषण केली. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याशी विविध पक्षांच्या गटनेत्यांनी चर्चा केल्यानंतर मार्ग काढण्यात आला.घटनेवरील चर्चेसह विरोधी पक्षांच्या सदस्यांनी संभल हिंसाचार आणि मणिपूरमधील स्थितीवरही चर्चा करण्याची मागणी केली आहे, त्याबाबत विचारले असता रिजिजू म्हणाले की, त्याबाबत नियमानुसार निर्णय घेण्यात येईल.
गदारोळामुळे कामकाज ठप्प
अदानी लाचखोरी प्रकरण, संभल हिंसाचार आणि मणिपूरच्या प्रश्नावरून संसदेत विरोधी पक्षांच्या सदस्यांनी जोरदार गदारोळ माजविल्याने सोमवारी लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले. त्यापूर्वी काँग्रेस आणि अन्य घटक पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर जोरदार टीका केली होती, तर काँग्रेस सत्तेवर असताना त्यांनीच घटनेचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन केल्याचा आरोप भाजपने केला आहे.