Video | गावात शिरलेल्या वाघाचा रुबाब… लोक बघत राहिले अन् तो आपल्या तोऱ्यात फिरत राहिला

यावेळी वाघाने आपल्यावर हल्ला करुन नये यासाठी लोकांनी तो उभ्या असलेल्या भींतीच्या आजूबाजूला कूंपण देखील घातले आहे.
Video | गावात शिरलेल्या वाघाचा रुबाब… लोक बघत राहिले अन् तो आपल्या तोऱ्यात फिरत राहिला
Published on

वाघ म्हटलं म्हणजे भल्याभल्यांची भंबेरी उडते. वाघ अचानक आपल्या समोर येऊन उभा राहिल्यास आपलं काय होईल, याचा विचार देखील केला जात नाही. सध्या वाघाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. यात उत्तर प्रदेशातील एका गावात एक वाघ शिरल्याचे दिसत आहे. हा वाघ एका भींतीवर उभा असून त्याला पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली. तसेच वाघाने आपल्यावर हल्ला करुन नये यासाठी लोकांनी तो उभ्या असलेल्या परिसराला कुंपण देखील घातले आहे.

ही घटना यूपीच्या पिलीभीतमधील कालीनगर तहसील भागातील अटकोना येथील असल्याचे सांगितले जात आहे. या गावात मध्यरात्रीच्या सुमारास एका वाघाला बघितले गेले. यानंतर लोकांनी सावध पवित्रा घेत वनविभागाला याबाबतची माहिती दिली आणि तात्काळ वाघ असलेल्या परिसराला तार आणि दोरीच्या सहाय्याने कुंपण घातले.

यानंतर लोकांना हा वाघ एका घराजवळील भींतीवर रुबाबात बसलेला दिसला. स्थानिकांनी सांगितल्यानुसार, गेल्या 8 ते 10 तासांपासून हा वाघ याच जागेवर आहे. कधी तो बसतोय, तर कधी याच भींतीवर चक्कर मारतोय. ही बातमी परिसरात वाऱ्याच्या वेगाने पसरल्याने लोकांनी सकाळ होताच वाघाला बघण्यासाठी मोठी गर्दी केली. अनेकजण तर वाघ बघण्यासाठी मिळेल त्या जागेवर चढले. वन विभागाच्या पथकाने 12  तासांनंतर या वाघाला रेस्क्यू केल्याचे सांगितले जात आहे.

वाघाला बघायला मोठी गर्दी झाली असली तरी, या वाघाने कोणावरही हल्ला केला नाही किंवा कोणाला काही ईजा पोहचवली नाही. मात्र, हे धोकेदायक ठरु शकत असल्याचेही बोलले जात आहे. दरम्यान, या परिसरात वाघ दिसणं किंवा गावात वाघ शिरणं या काही नव्या घटना नाहीत. या आधीदेखील या परिसरात अशा घटना घडल्या आहेत.

या व्हिडिओवर लोकांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने , “मोफत जंगल सफारी”, असे म्हटले. तर दुसऱ्याने, “हा वाघ अस्वस्थ असून लवकरच वैद्यकीय सेवा त्याच्यापर्यंत पोहचेल अशी आशा”, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर एकाने, “So beautiful… so elegant… “ असे म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in