
प्रयागराज : संभल जामा मशीद प्रकरणात मुस्लिम पक्षाला मोठा धक्का बसला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने मशिदीला रंगवण्याची परवानगी दिली नाही. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणने (एएसआय) शुक्रवारी सकाळी आपला अहवाल सादर केला. ‘एएसआय’ने अहवालात म्हटले आहे की, मशिदीचे रंगकाम अजूनही ठीक आहे. यानंतर उच्च न्यायालयाने ‘एएसआय’च्या देखरेखीखाली तत्काळ साफसफाईचे आदेश दिले.
२५ फेब्रुवारीला जामा मशीद समितीचे वकील जाहिद असगर यांनी मशिदीला रंगविण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयात यावर गुरुवारी सुनावणी झाली. उच्च न्यायालयाने मशिदीच्या बाजूच्या याचिकेवर सुनावणी करताना तीन सदस्यीय समिती स्थापन केली. यामध्ये मशिदीचे मुतवल्ली आणि ‘एएसआय’ यांचाही समावेश होता. न्यायालयाने समितीला मशिदीची तपासणी करून २४ तासांच्या आत म्हणजे शुक्रवारपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. शुक्रवारी सकाळीच ‘एएसआय’ने अहवाल सादर केला. शुक्रवारी सकाळी १० वाजता न्यायमूर्ती रोहित रंजन अग्रवाल यांच्या एकल खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.
या अहवालावर आक्षेप नोंदवण्यासाठी मशीद समितीला ४ मार्चपर्यंतचा अवधी देण्यात आला असून, उच्च न्यायालय ४ मार्च रोजी पुन्हा या प्रकरणाची सुनावणी करणार आहे.