लढतीचा दुसरा दिवस मुंबईच्या फलंदाजांनी गाजविला

लढतीचा दुसरा दिवस मुंबईच्या फलंदाजांनी गाजविला
Published on

दुखापतग्रस्त अजिंक्य रहाणेच्या जागी संघात समावेश करणाऱ्या सुवेद पारकरने संधीचे सोने करत पहिल्याच सामन्यात इतिहास रचला. सोमवारी शतक झळकविणाऱ्या सुवेदने मंगळवारी पदार्पणातच शतकाचे रूपांतर द्विशतकात केले. त्याने अजिंक्य रहाणेची उणीव भरून काढली.

उपांत्यपूर्व लढतीचा दुसरा दिवस मुंबईच्या फलंदाजांनी गाजविला. पदार्पण करणाऱ्या सुवेदने १२३ चेंडूत आपले पहिले अर्धशतक पूर्ण केले होते. त्यानंतर २०६ चेंडूत ८ चौकार आणि दोन षट्कारांच्या मदतीने त्याने आपले प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पहिले शतक पूर्ण केले; पण सुवेद इथेच थांबला नाही तर ३७५ चेंडूंचा सामना करून आपले पहिले द्विशतक साजरे केले. तो १६७व्या षट्काच्या चौथ्या चेंडूवर धावचीत झाला. बाद फेरीत पदार्पण करताना द्विशतक झळकावणारा सुवेद रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील दुसरा फलंदाज ठरला. यापूर्वी १९९४ मध्ये अमोल मुजुमदारने हरयाणाविरुद्ध द्विशतक झळकावून इतिहास रचला होता. आता अमोल मुजुमदार मुंबईच्या संघाचे प्रशिक्षक आहेत. मुंबईच्या डावात अरमान जाफर (१३३ चेंडूंत ६०), शम्स मुलानी (८२ चेंडूंत ५९) यांनीही चमकदार कामगिरी केली. उत्तराखंडच्या दीपक धापोलाने तीन विकेट‌्स घेतल्या. अग्रीम तिवारी, स्वप्निल सिंग, मयंक मिश्रा, कमल सिंग यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केला. दरम्यान, रणजी करंडक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्यासाठी आठ संघ आपापसात भिडलेले आहेत. चारही सामने ६ जून ते १० जून या कालाधीत बंगळुरूमध्ये खेळविले जात आहेत.

logo
marathi.freepressjournal.in