...तर स्वबळाचा नारा! काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे स्पष्टीकरण

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
...तर स्वबळाचा नारा! काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे स्पष्टीकरण

लुधियाना : मोदी सरकारचा पराभव करण्यासाठी इंडिया आघाडी उभी राहिली आहे. कुठे कुठे आघाडी योग्य दिशेने सुरू आहे. काही ठिकाणी जुळत नाही. आता आम्हाला लढायचे आहे, हे समजून घ्या. शेवटपर्यंत लढून विजय मिळवायचा आहे. कोणी आले तरी ठीक आहे, कोणी नाही आले तरी ठीक. संपूर्ण देशात आम्ही हा निर्णय घेतला आहे. आम्हाला खंबीरपणे लढावे लागेल, असे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, गेल्या दहा वर्षांत मोदी सरकारने शेतकी, जवान यांना उद्ध्वस्त केले. माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांनी ‘जय जवान, जय किसान’ ही घोषणा दिली. ही घोषणा पंजाबला पूर्णपणे लागू होते. कारण पंजाबमध्येच ‘जवान’ व ‘किसान’ सापडतात. अनेक राज्यांत ‘किसान’ असतात, मात्र ‘जवान’ नसतात, तर अनेक राज्यांत ‘जवान’ असतात, पण ‘किसान’ नसतात. मोदी सरकारने या दोघांनाही उद‌्ध्वस्त केले. दिल्लीच्या सीमेवर नवीन कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी लढा दिला. केंद्र सरकारने हे कायदे निलंबित केले. मात्र, हे कायदे रद्द केल्याची अधिसूचना जारी केली नाही, असा दावा खर्गे यांनी केला.

पंडित नेहरू यांनी सार्वजनिक क्षेत्रात मोठे उद्योग उभे केले. आताचे पंतप्रधान आपल्या मित्रांना हे उद्योग वाटून टाकत आहेत, असा आरोप त्यांनी केला. आम्ही धरणे, हरित क्रांती केली. आता भाजप व पंतप्रधान मोदी यांनी देशात केलेली एक योजना जाहीर करावी, असे आव्हान त्यांनी दिले. पंजाबच्या खन्नामध्ये ‘आप’चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीकर सातही लोकसभेच्या जागा आपल्याला देतील, असे म्हणाले होते. यावरून आतापर्यंत शांत बसलेले काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी प्रतिक्रिया दिली.

काँग्रेसच्या आडमुठेपणामुळे अनेक ठिकाणी एकटे लढत असल्याचा दावा विरोधी पक्षांनी केला आहे. यामुळे इंडिया आघाडीची निवडणुकीपूर्वीच शकले झाली आहेत. असे असताना आता उरलीसुरली आघाडीपण तुटण्याच्या उंबरठ्यावर आहे. चार महिन्यांपूर्वी एकजूट दाखविणारे विरोधी पक्ष कॅरमच्या सोंगट्यांप्रमाणे विखुरले आहेत. त्यांचा मुखिया तर भाजपसोबत जाऊन बसला आहे.

केजरीवाल यांनी पंजाब, चंदिगडमध्ये एकट्याने निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. दिल्लीतही आजचे त्यांचे वक्तव्य काँग्रेसला बाजूलाच ठेवण्याचे आहे. यामुळे आता काँग्रेसनेही तलवार उपसली असून खर्गे यांनी देखील एकट्याच्या जीवावर लढणार असल्याचे वक्तव्य केले आहे. पंजाबमध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी आपसोबत आघाडी न करण्याची मागणी हायकमांडकडे केली होती. आपसोबत आघाडी करून लढल्यास त्याचा तोटाच होईल, असे या नेत्यांचे म्हणणे आहे.

१ लाख कोटी परत गेले

शेती खात्याला १ लाख कोटी रुपयांची रक्कम मंजूर केली होती. मात्र त्यांनी ही रक्कम शेतीवर खर्चच केली नाही. त्यामुळे हा प्रचंड निधी परत गेला. ‘फसल बीमा योजने’साठी सरकारने ४० हजार कोटींची तरतूद केली. तो पैसा खासगी विमा कंपन्यांच्या खिशात गेला. स्वतंत्र भारताच्या इतिहासात शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये कर भरावा लागला, असे त्यांनी सांगितले. मोदी सरकारने सरकारच्या विविध विभागातील ३० लाख जागा भरल्या नाहीत. या सरकारी नोकऱ्यांमध्ये एससी व एसटींना ५० टक्के आरक्षण मिळावे, अशी मोदी सरकारची इच्छा नाही, असे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी १३ फेब्रुवारीला ‘दिल्ली चलो’ची हाक दिली आहे. या शेतकऱ्यांना काँग्रेसचा पाठिंबा आहे, असे त्यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in