निवडणूक रोख्यांबाबतचा सर्व तपशील आयोगास सादर; स्टेट बँकेचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र

रोखे खरेदीदाराचे नाव, त्याने किती रोखे खरेदी केले आणि त्याचे विशिष्ट क्रमांक, ज्या पक्षाने त्याचे रोखीकरण केले, राजकीय पक्षांच्या बँक खात्यांच्या क्रमांकातील अखेरचे चार क्रमांक आदींसह सर्व तपशील सादर करण्यात आला आहे, असे स्टेट बँकेने प्रतिज्ञापत्रामध्ये म्हटले आहे.
निवडणूक रोख्यांबाबतचा सर्व तपशील आयोगास सादर; स्टेट बँकेचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र

नवी दिल्ली : निवडणूक रोख्यांचा संपूर्ण तपशील सादर करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने तीन वेळा फटकारून अखेरची मुदत दिल्यानंतर भारतीय स्टेट बँकेने गुरुवारी रोख्यांबाबतचा सर्व तपशील निवडणूक आयोगाकडे सादर केला.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यात आले असल्याबद्दलचे प्रतिज्ञापत्र गुरुवारी स्टेट बँकेच्या वतीने अध्यक्ष दिनेशकुमार खारा यांनी न्यायालयात सादर केले. मात्र, राजकीय पक्षाचा संपूर्ण बँक खाते क्रमांक आणि 'केवायसी'बाबतचा सविस्तर तपशील त्यामध्ये जाहीर करण्यात आलेला नाही. कारण त्यामुळे खात्याच्या सुरक्षेला धोका (सायबर सुरक्षा) निर्माण होऊ शकतो, असे खारा यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये म्हटले आहे. त्याचप्रमाणे खरेदीदाराचा 'केवायसी' तपशील सुरक्षेच्या कारणास्तव जाहीर करण्यात आलेला नाही, कारण राजकीय पक्ष नेमका कोणता ते ओळखण्यासाठी तो आवश्यक नाही, असेही खारा यांनी प्रतिज्ञापत्रामध्ये म्हटले आहे. रोखे खरेदीदाराचे नाव, त्याने किती रोखे खरेदी केले आणि त्याचे विशिष्ट क्रमांक, ज्या पक्षाने त्याचे रोखीकरण केले, राजकीय पक्षांच्या बँक खात्यांच्या क्रमांकातील अखेरचे चार क्रमांक आदींसह सर्व तपशील सादर करण्यात आला आहे, असे स्टेट बँकेने प्रतिज्ञापत्रामध्ये म्हटले आहे.

स्टेट बँकेने २१ मार्च २०२४ रोजी त्यांच्याकडे असलेला निवडणूक रोख्यांबाबतचा सर्व तपशील निवडणूक आयोगाला उपलब्ध करून दिला आहे, असेही प्रतिज्ञापत्रामध्ये म्हटले आहे. स्टेट बँकेने पूर्ण खाते क्रमांक आणि 'केवायसी' तपशील वगळता अन्य सर्व तपशील आता सादर केला आहे, असे आम्ही आदरपूर्वक स्पष्ट करतो, असेही बँकेने स्पष्ट केले आहे.

कोर्टाच्या फटकाऱ्यानंतर बँकेकडून सर्व तपशील सादर

रोख्यांबाबत निवडक तपशीलच जाहीर करू नका, लपवालपवी करू नका, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने १८ मार्च रोजी स्टेट बँकेला फटकारले होते आणि २१ मार्चपर्यंत रोख्यांबाबतचा सविस्तर तपशील जाहीर करण्याचे आदेश दिले होते.

निवडणूक रोख्यांचा सर्व तपशीलआयोगाच्या संकेतस्थळावर

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार भारतीय स्टेट बँकेने निवडणूक रोख्यांबाबतचा सविस्तर तपशील निवडणूक आयोगाला सादर केल्यानंतर आयोगाने हा सर्व तपशील आपल्या संकेतस्थळावर टाकला आहे. रोख्यांचे क्रमांक, खरेदीदारांची माहिती, राजकीय पक्ष आणि त्यांना मिळालेला निधी यासह स्टेट बँकेने उपलब्ध करून दिलेला तपशील आयोगाने संकेतस्थळावर टाकला. देणगीदार आणि लाभार्थी अशा दोन स्वतंत्र याद्या संकेतस्थळावर आयोगाने प्रसिद्ध केल्या आहेत.

logo
marathi.freepressjournal.in